Conjoined Twins in India : महिलेने सयामी जुळ्यांसह तीन मुलींना दिला जन्म, पहा व्हिडिओ
Published: May 25, 2023, 9:22 AM

जळगाव- एका खासगी दवाखान्यात एका महिलेने तीन मुलींना जन्म दिला. त्यात सयामी जुळ्या आहेत. या चिमुकलींना एकच हृदय, शरीर, दोन हात व पाय सारखेच आहेत. एकाच हृदयावर दोघींचा श्वास सुरू राहतो. त्यामुळे जन्मल्यानंतर दोघींना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेने गर्भधारणा झाल्यानंतर तपासणी केली. तेव्हा तिला तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ सुरक्षित असल्याने गर्भपात करणे शक्य नव्हते. त्यामुळे या दाम्पत्याने बाळंतपणासाठी तयारी दाखविली. पालकांच्या समंतीनंतर डॉ. नवाल यांनी बुधवारी सकाळी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. नवजात लेकींपैकी जुळलेल्या जुळ्यांचे बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरव महाजन यांच्याकडे उपचार सुरू करण्यात आले. नवजात जुळ्या लेकींना मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र, दोघींना जगण्यासाठी शरीर, हात आणि पाय एकत्रित आहेत. त्यामुळे दोघींना दोन हातांनी आणि पायांनी एकमेकींच्या साथीने जगावे लागणार आहे. यापुढेही हे सयामी जुळे आयुष्यभर असे राहू शकतात, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरव महाजन यांनी व्यक्त केले.