Maratha Reservation : 500 ट्रॅक्टरसह आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी रवाना ; पहा व्हिडिओ
जालना Maratha Reservation : मराठा आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 15 दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी जालन्यातील बदनापूर येथुन सकल मराठा समाजच्या वतीने अंतरवली सराटीपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात ५०० हून अधिक ट्रॅक्टरसह हजारो आंदोलक सहभागी झाले होते. मराठा आरक्षण त्वरीत लागू करावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे जरांगे पाटीलांनी आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या या आंदोलनाला अनेक ठिकाणी पाठिंबा मिळत असून गावा-गावात ठिय्या आंदोलनं, उपोषणं तसंच आंदोलने सुरू आहेत. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने मागील पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आंदोलन आणखी तीव्र करत जरांगेंना पाठिंबा देण्याच्या उददेशाने बदनापूर ते अंतरवाली सराटीपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढलाय. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर फाटा येथून 500 ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये हजारो आंदोलक अंतरवाली सराटीकडे रवाना झालेत.