ETV Bharat / state

'सरणानंतरची धग'.. मुलीच्या लग्नासाठी बाप फासावर लटकला, कापूस बोंडअळीनं कुरतडला अन् सोयाबीन पाण्यात गेलं

author img

By

Published : Nov 28, 2020, 3:33 PM IST

Updated : Nov 28, 2020, 4:25 PM IST

Farmer commits suicide in Yavatmal
मुलीच्या लग्नासाठी बाप फासावर लटकला

वडिलोपार्जित बारा एकर शेती. त्यावर चार मुली व एक मुलगा, पत्नी व वृद्ध आईचा सांभाळ.. अर्थाजर्नाचे दुसरे कोणतेच साधन नाही. त्याच बोंड अळी व अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. या नैराश्येतून ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मात्र त्याच्या कुटूंबाची परवड अजूनही सुरूच आहे.

यवतमाळ - घरच्या बारा एकर शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. चार बहिणी व एका भावाचा भार खांद्यावर घेवून आमचा बाप पार थकून गेला होता. तिघींचं लग्न झालं. तिसरीच्या लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही. माझ्या लग्नाचं काय करावं. यावर्षीच्या उत्पन्नातून लग्न करावं, असा विचार बाबांच्या डोक्यात होता. पण निसर्गानं घात केला शेतातील पिके बोंडअळी व अतीवृष्टीने वाया गेली. डोक्यावर असलेलं कर्ज व लग्नाचं कसं करावं या विचारानं बाबांनी फाशी घेतल्याचे पाणावलेल्या डोळ्याने उपवर असलेली प्रियंका कुटुंबाची व्यथा मांडत होती. नेर तालुक्यातील पिंपरी कलगा या गावातील बारा एकराचा मालक असलेल्या नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या कुटुंबाची ही आपबीती. पिंपरी कलगा येथील राजेश तुपटकर (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव.

निसर्गाने स्वप्नांवर फिरवले पाणी -

मृत राजेश तुपटकर आपल्या वडिलोपार्जित 12 एकरात कुटुंबाचा गाढा ओढत होते. वडील गेले, 80 वर्षीय आई शेवंता आहे. पत्नी शीला व राजेशने काबाडकष्ट करीत पाचही मुलांना कसेबसे मोठे केले. अशाच तीन मुलींचे लग्नही केले. परिस्थिती अभावी मुलगा शुभमला बारावीनंतर शिकता आले नाही. अलीकडच्या काळात नापिकीमुळे तिसऱ्या मुलीच्या वेळेस लग्नासाठी काढलेले कर्ज अजूनही फिटले नाही. अशात चौथी मुलगीही उपवर झाली. मुलीच्या लग्नाची काळजी या असाहाय्य बापाला आतून अस्वस्थ करीत त्याचं काळीज कुरतडीत होती. या वर्षीच्या पिकातून मुलीचं लग्न आपण कसंबस उरकू अशी आशा या बापाला होती. त्या पिकासोबत त्याचे स्वप्नही बहरत गेले. परंतु याहीवर्षी निसर्गाने घात केला.

शेतकरी आत्महत्येनंतर कुटूंबाची परवड
साठ क्विंटल ऐवजी बारा क्विंटल सोयाबीन -
बारा एकरातील तीन एकर शेती पडीक. दोन एकरात कपाशीची पेरणी केली होती. तर उर्वरित सहा एकरात सोयाबीन तूर असे पीक घेतले होते. कपाशी तर चांगली मेहनत ही केली होती. परंतु बोंडअळीने आतून पूर्ण बोंडे कुरतडून टाकत हिरव स्वप्नं भंग केलं. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या परतीच्या पावसाने उरलेसुरले सोयाबीन मातीमोल करून टाकले. सहा एकरात साठ पोत्याऐवजी अवघे बारा क्विंटल सोयाबीन झाले. तेही सडके व बेभाव खपणारे.
डोक्यावर दोन लाखाचे कर्ज -
युनियन बँकेचे दोन लाखाचे कर्ज थकित होते. कर्ज पुनर्गठन केल्यावर आणखी एक लाख मिळाले. दुसऱ्या पुनर्गठनात परत एक लाख असा साडेचार लाखाचा कर्जाचा डोंगर छातीवर उभा झाला. एकीकडे कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे उपवर मुलगी. हातात कवडीचाही पैसा नाही. कर्जाचा डोंगर व मुलीच्या लग्नाच्या चिंतेत राजेशने अखेर आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. घरातच गळफास घेऊन त्याने यासर्व विवंचनेतून स्वतःची सुटका केली.
मालक झाला कफल्लक -
पूर्वी बारा एकराचा शेतकरी धनवान समजला जायचा. अनेक कुटुंबाचे पोषण त्याचेकडून व्हायचे. म्हणून त्याला मालक अशी उपाधी होती. आता काळ बदलला मालक आता कफल्लक झाला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रचंड दुरवस्थेचं गमक शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणात दडलंय. एका दाण्याचे हजार दाणे करणारा जगाचा पोशिंदा आता व्यवस्थेशी दोन हात करीत निराशेच्या दीर्घ काळोखात गडप होत आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्यांना सरकारचे धोरण कारणीभूत ठरत आहे.
Last Updated :Nov 28, 2020, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.