ETV Bharat / state

Mumbai Bomb Blast Case : बाँबस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या साकिबचा मुलगा शमीलही दहशतवादी कृत्यात सहभागी

author img

By

Published : Aug 12, 2023, 6:00 PM IST

Mumbai Bomb Blast Case
शमीलही दहशतवादी कृत्यात सहभागी

मुंबई शहरात झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील १० वर्षांच्या शिक्षेनंतर २०१७ मध्ये साकिबची सुटका झाली होती. आता त्याचा मुलगाही दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने त्यालाही पडघा-बोरिवली गावातून ११ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. 'आयसिस' दहशतवादी संघटनेचा संशयित सदस्य शमील साकिब नाचण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठाणे : पडघा परिसरातून ६ ऑगस्टला शमीलचा नातेवाईक अकिब नाचणलाही याच परिसरातून अटक केली होती. तर गेल्याच महिन्यात याच परिसरातून शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना अटक केली. विशेष म्हणजे शमीलचा बाप साकिब नाचण हा बंदी असलेल्या ‘सिमी’ संघटनेचा पदाधिकारी होता. त्यामुळे देशविघातक व दहशतवादी कृत्यांत पडघा-बोरीवली हे गाव सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

शमीलला बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण : 'एनआयए'च्या पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पडघा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक धाड टाकली होती. या धाडी दरम्यान शमीलला ताब्यात घेऊन 'एनआयए'च्या पथकाने त्याला अटक केली. शमील हा दहशतवादी कृत्यांसाठी बॉंबस्फोट घडून आणण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याची चाचणी करत असल्याचे तपासात समोर आले. तो यापूर्वी अटक केलेल्या अकिब नाचण, जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने काम करत होता.

तरुणांना शस्त्रे बनविण्याचे प्रशिक्षण : 'एनआयए' अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेल्या सहा जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. तरुणांना शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले असून आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती. ज्यात बॉंब तयार करणे, लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे या कृत्यांचा समावेश होता. त्यांच्या परदेशातील आयसिसच्या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही 'एनआयए'च्या तपासात समोर आले.

आरोपींचा भारतविरोधी अजेंडा उघड : 'एनआयए' पथकाने आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात २८ जून २०२३ रोजी पाच ठिकाणी संशयिताच्या घरांची झडती घेतली होती. त्यावेळीही आरोपींच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे, गुन्ह्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले होते. याच्या पडताळणीतून आरोपींचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनांचा भारतविरोधी अजेंडा पुढे आला होता. असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे सांगण्यात आले. अटक केलेल्या सहा जणांपैकी एकट्या पडघा-बोरिवली गावातून आतापर्यंत चार जणांना देशविघातक व दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने अटक करण्यात आली.

साकीब नाचण 'या' प्रकरणात दोषी : शुक्रवारी अटक केलेल्या शमीलचे वडील साकीब नाचण याला २७ जानेवारी २००३ सीएसटीहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल तसेच विलेपार्ले मार्केटमधील बॉम्बस्फोट आणि ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या इमारतीतील रेस्टॉरंटमध्ये तीन बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यावेळी साखळी बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता. या साखळी बॉम्बस्फोटात एकूण १३ आरोपींपैकी १० आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यामध्ये साकीबचा समावेश होता.

दहशतवादी साकीबचे जंगी स्वागत : कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर २०१७ मध्ये साबिकच्या सुटकेनंतर पडघा-बोरीवली गावात साकीबचे जंगी स्वागत झाले होते. विशेष म्हणजे, साबिकच्या अटकेवेळी गावातील काही ग्रामस्थांनी पोलिसांसह 'एनआयए'च्या पथकाला अडविण्याचा आणि हल्ल्याचा प्रकार झाला होता. तेव्हापासून 'एनआयए' पथक आणि पोलीस या गावात प्रवेश करताना अधिक सर्तक आणि सावध असल्यानेच पडघा-बोरीवली गावातून साबिकच्या सुटकेनंतर आतापर्यंत चार जणांना छापेमारी करून अटक केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा:

  1. Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?
  2. एटीएसने अटक केलेले 'ते' आरोपी मुंबईतील मंदिराच्या भंडाऱ्यात कालवणार होते विष
  3. अल कायदाचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन एटीएसच्या ताब्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.