ठाणे : ठाण्यात काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. त्यानंतर या महिला कार्यकर्तीला ठाण्यातून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणी महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकावे अशी मागणी करण्यात आली होती. या महिला कार्यकर्तीवर एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे.
बोलण्यास नकार : या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येला भेट देत आहेत. या भेटीदरम्यान सुमारे दहा हजार शिवसैनिक अयोध्येला जात आहेत. त्यामधून तीन हजार शिवसैनिक आज ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या विशेष ट्रेनने आयोध्याकडे प्रस्थान करत आहेत. असे असताना नेमक्या ठाणेकरांच्या प्रतिक्रिया काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ठाण्यातील शिवसैनिकांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
ठाणेकरांमध्ये दहशत : ठाणेकरांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला आहे. आम्हाला या ठिकाणी राहायचे आहे, त्या दिवशी एका महिला कार्यकर्तेला मारले आहे. आमची परिस्थिती तशी होऊ शकते. त्यामुळे आम्हाला काही बोलायचे नाही. आम्हाला इथे राहायचेआहे, आम्हाला इथे धंदा करायचा आहे, आम्हाला या ठिकाणी नोकरी करायची आहे. त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही असे सांगितले आहे. यावरून शिवसेनेची दहशत ठाणेकरांमध्ये असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार, पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यामध्ये त्यांना भगवान श्री रामाचे दर्शन, हनुमान गढीचे दर्शन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती, लक्ष्मण किल्याला ते भेट देतील. तसेच संतांचे आशीर्वाद देखील मुख्यमंत्री घेणार आहेत. शिवसैनिक ८ एप्रिलला अयोध्येला जाणार आहेत, तर, मुख्यमंत्री शिंदे ९ एप्रिलला अयोध्येला जाणार आहेत. संध्याकाळी शरयू आरती करून ते मुंबईला परतणार आहेत.