ETV Bharat / state

पद शिपाई काम मात्र बोगस डॉक्टर.. ५ रुग्णांचा जीव घेणाऱ्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी, 13 वर्षानंतर बोगसगिरी समोर

author img

By

Published : Jan 28, 2022, 10:22 PM IST

bogus doctor
bogus doctor

मुरबाड तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ७२ वर्षीय बोगस डॉक्टरने आपल्या राहत्या घरातच दवाखाना थाटला. विशेष म्हणजे २००९ पासून धसई परिसरात हा बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र त्याच्या चुकीच्या उपचारामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्याच्या बोगसगिरीचा कारनामा १३ वर्षानंतर समोर आला.

ठाणे - मुरबाड तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ७२ वर्षीय बोगस डॉक्टरने आपल्या राहत्या घरातच दवाखाना थाटला. विशेष म्हणजे २००९ पासून धसई परिसरात हा बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र त्याच्या चुकीच्या उपचारामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्याच्या बोगसगिरीचा कारनामा १३ वर्षानंतर समोर आला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. पाडुरंग दगडू घोलप (७२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

५ रुग्णांचा जीव घेणाऱ्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला केली अटक..
आरोपी पांडुरंग हा धसई आरोग्य केंद्रात शिफाई म्हणून कार्यरत होता. त्याने राहत्या घरी त्यांच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. त्यातच राम भिवा असवले (वय 55 वर्ष) अलका रवींद्र मुकणे (वय 22 वर्ष, रा. मिल्हे,) आशा बुधाजी नाईक (वय 30 वर्ष) यांच्यावर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे केवळ अंगदुखी, सर्दी, ताप याचा त्रास या रुग्णांना होता. दोनच दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू चुकीच्या उपचारामुळे झाल्यानंतर डॉ. उमेश विठ्ठल वाघमोडे , (वय 34 वर्ष,) वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र धसई, यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी पांडुरंगवर भादंवि कलम 420, 304 सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 कलम 33, (2) (अ), 33-अ, (2) (अ) प्रमाणे दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी आरोपीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक़ केली.
आरोपीच्या घरी पोलीस व आरोग्य पथकाचा छापा..
घटना घडल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परडे आणि औषध प्रशासनाचे एक पथक आरोपीच्या घरी जाऊन पंचनामा करीत घटनास्थळावरुन काही साहित्य व औषधे जप्त केली. तसेच तालुक्यात असलेल्या इतरही बोगस डॉक्टरांची माहिती ग्रामस्थांनी द्यावी जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे यांनी केली आहे.
पाच रुग्णांचा आतापर्यत गेला जीव..
आरोपी पांडुरंग हा सेवेत असताना बिनभोभाट दवाखान्यात डाॅक्टर म्हणून गोरगरिबांवर उपचार करीत होता. त्यांनतर सेवेतून निवृत्त झाल्यावर त्याने आपल्या घरात दवाखाना थाटून अल्पदरात रुग्णांवर उपचार सुरु केले. त्यातच 24 व 26 जानेवारी रोजी धसई परीसरातील इंदिरानगर (वाडी) येथील बारकुबाई किसन वाघ, चिखलीवाडी (धसई) येथील आशा बुधाजी नाईक या आदिवासी महिलांवर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतांनाच राम भिवा आसवले (रा. मिल्हे) , आलका रविंद्र मुकणे (रा.मिल्हे) , लक्ष्मण मगन मोरे (रा .पळु ) यांच्यावर पांडुरंग घोलप याने चुकीचे उपचाराने केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आरोपीवर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी..
तालुक्यात गावपाड्यात आरोपी पांडुरंग सारख्या बोगस डाॅक्टरांनी अनेक दुकाने थाटून गोरगरीबांच्या जिवाशी खेळ मांडला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. तर या डाॅक्टरवर कलम ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी क्रांती सेनेचे उपाध्यक्ष बाळू दळवी यांनी केली आहे. तालुक्यात बोगस डाॅक्टर, बोगस लॅब व बोगस मेडिकल स्टोअर यांच्या संगनमताने गोरगरीबांचे बळी जात असतांना जिल्हा आरोग्य यंञणा कोमात असल्याने ही बोगस यंञणा जोमात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी पांडुरंग घोलप या बोगस डाॅक्टरने काही दिवसापुर्वी उपचार केलेल्या अन्य रुग्णांची चौकशी सुरु असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगितले आहे.
बोगस डॉक्टर ठरताहेत आदिवासींच्या मृत्यूला कारणीभूत..
आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने वेळोवेळी आरोग्य विभाग मुरबाड यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्या संदर्भात लेखी तक्रारी देऊन देखील आरोग्य यंत्रणेच्या कुचकामी भुमिकेमुळे गेल्या आठ दिवसांपासून धसई परिसरातील आदिवासी रुग्णांचा बोगस डॉक्टर पांडुरंगने दिलेल्या चुकीच्या उपचारांमुळे पाच ते सहा आदिवासी रुग्णाचा नाहक बळी गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.