ETV Bharat / state

भारत बंद : सोलापुरातील एमआयडीसीमध्ये कडकडीत बंद

author img

By

Published : Dec 8, 2020, 10:19 AM IST

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (8 डिसेंबर) रोजी शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्याला कामगार संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. सोलापूरमध्ये एमआयडीसी बंद ठेवण्यात आली आहे.

Agitation
आंदोलन

सोलापूर - दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज 'भारत बंद' आंदोलन होत आहे. सर्वांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले होते. त्या अनुषंगाने आज सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमधील सर्व कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत.

सोलापूरमधील कामगारांनी भारत बंदला प्रतिसाद दिला

कामगारांनी सुट्टी घेतल्याने कारखाने ठप्प, मार्केट यार्ड बंद -

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कामगारांनी पाठिंबा दिला आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील बहुतांश कारखाने कामगार कामावर आले नसल्याने बंद आहेत. कामगार संघटना सिटू व माकपच्या काही कार्यकर्त्यांनी चालू असलेल्या कारखान्यानांनादेखील काम बंद करण्याची विनंती केली. कृषी विषयक धोरणांच्या निषेधार्थ शेतकरी कृषी उत्पन्न समिती म्हणजेच मार्केट यार्ड देखील बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.

माकप नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा -

माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे. विडी कामगार, यंत्रमाग कामगार, शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

भारत बंदला विविध पक्षांचा पाठिंबा -

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगण राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस, कमल हासन यांच्या मक्काल निधि मय्यम या पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवला असून आजचा बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.