ETV Bharat / state

Solapur Drugs Factory : उडता सोलापूर; पुणे राष्ट्रीय महामार्गावर सहा कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त, ड्रग्ज तस्करांना पोलीस कोठडी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 1:28 PM IST

Solapur Drugs Factory : सोलापूर पोलिसांनी दोन ड्रग्ज तस्करांना अटक केलं आहे. या ड्रग्ज तस्करांकडून सहा कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. या तस्करांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Solapur Drugs Factory
संग्रहित छायाचित्र

सोलापूर Solapur Drugs Factory : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोहोळ पोलिसांनी 3 किलो 6 ग्रॅम एमडी ड्रग्जसाठा जप्त केला आहे. दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके असं पोलिसांनी पकडलेल्या तस्करांची नावं आहेत. 2016 साली पहिल्यांदा इफेड्रीन नावाचा कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीत आढळला होता. त्यानंतर त्याच चिंचोळी एमआयडीसीत 15 ऑक्टोबर 2023 रोजी 116 कोटी रुपयांचा मेफेडरीन (एमडी) ड्रग्ज आढळले. पुन्हा एकदा मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर पोलिसांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवडी फाट्याजवळ सहा कोटींचा एमडी ड्रग्ज पकडला आहे. तिसऱ्यांदा सोलापुरात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जसाठा आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

ड्रग्जची तस्करी करताना घोडके बंधुना अटक : सोलापूर पोलिसांनी सहा कोटींचा ड्रग्जसाठा चिंचोळी एमआयडीसी जवळ असलेल्या देवडी फाट्यावरुन जप्त केला आहे. दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (रा. औंढी. ता मोहोळ, जि सोलापूर) या दोघांना अटक केलं आहे. अतिशय गुप्तपणानं तपास करत सोलापूर पोलिसांनी कारवाई फत्ते केली आहे. दोन संशयितांना कोर्टात हजर केलं असता, त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 किलो 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, ( किंमत 6 कोटी 2 लाख रुपये), नोकिया कंपनीचा एक मोबाईल व सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल, तीन लाख रुपयांची चार चाकी वाहन ( एमएच 12 पी क्यू 8098 ), असा एकूण 6 कोटी, 5 लाख, 14 हजार रुपयांचा मुद्देमाल सोलापूर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे करत आहेत.

अगोदर गवळी बंधू तर आता घोडके बंधू अटक : मुंबईच्या गुन्हे शाखेच्या युनिट-9 च्या दया नायक यांच्या टीमनx सोलापुरातील गवळी बंधूना ड्रग्ज विक्री करताना मुंबईत अटक केलं होतं. सोलापूर पोलिसांनी 6 कोटी रुपयांची ड्रग्ज तस्करी करताना घोडके बंधूना अटक केली आहे. मुंबई पोलीस तपास करत असताना राहुल किसन गवळी व अतुल किसन गवळी हे सोलापूरचे असल्याचं निष्पन्न झालं होतं. अधिक तपास करत असताना गवळी बंधूनी सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीत ड्रग्ज तयार करत असल्याची कबुली दिली होती. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस सोमवारी पहाटेच्या सुमारास सोलापुरात येऊन 116 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त करून गेले होते. ही घटना ताजी असताना सोलापूर मोहोळ पोलिसांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवडी फाट्या जवळ 6 कोटींचा ड्रग्जसाठा पकडला आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईत गवळी बंधू जेरबंद झाले तर, सोलापूर पोलिसांच्या कारवाईत घोडके बंधू जेरबंद करण्यात आले आहेत.

ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी संशयीत आरोपी : सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी परिसरातील एऑन लाईफ सायन्स कंपनीमध्ये 2016 साली अशाच पद्धतीनं ठाणे गुन्हे शाखेनं कारवाई केली होती. मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यावेळी देखील 18 हजार किलो ड्रग्ज सदृश्य इफेड्रीन पावडर ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आली होती. त्यावेळी ममता कुलकर्णी आणि तिचा प्रियकर विकी गोस्वामी हे संशयीत आरोपी होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच कारवाई झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्जवर कारवाई करण्यात येत आहे. सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसीचं नाव आंतरराष्ट्रीय ड्रग्जच्या बाजारात येत असल्यानं सोलापुरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

  1. Lalit Patil Case Exclusive : छोटा राजनच्या साथीदारांच्या ललित पाटील कसा आला संपर्कात? वाचा सविस्तर...
  2. Action on Drugs in Solapur : एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; एमडी ड्रग्ज बाजारात पुन्हा आलं सोलापूरचंही नाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.