ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जिवंत आंदोलक तरुण स्मशानभूमीत सरणावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 10:17 PM IST

Samadhi Andolan
जिवंतपणी अंत्ययात्रा काढली

Maratha Reservation : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं (Samadhi Andolan) करण्यात येत आहेत. सोलापुरात तळे हिप्परगा येथील एका मराठा समाज बांधवानं जिवंत चितेवर झोपून मराठा आरक्षणाची मागणी केली.

मराठा आरक्षणासाठी काढली जिवंतपणी अंत्ययात्रा

सोलापूर Maratha Reservation : मराठा समाजाचं जीवन चितेप्रमाणे राख झालं आहे. ही राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी सरणावर चढून आंदोलन केलं. सोलापूर शहराजवळ असलेल्या तळे हिप्परगा येथे सरणावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. चिता समाधी आंदोलन बेमुदत असल्याची माहिती, छावा संघटनेच्या वतीनं देण्यात आली.

छावा संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षणाची मागणी : राष्ट्रीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यां व कार्यकर्त्यांनी चितेवर बेमुद्दत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रीय छावाचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे व प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी सरणावर झोपून तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये बेमुदत जिवंत चिता समाधी आंदोलनाला सुरुवात केली. तर सोलापुरातील मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासाठी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढून राज्य सरकारचा निषेध केला आहे.

सोलापुरात जिवंत चिता समाधी : आजपर्यंत मराठा समाजाला कोणतेही शासकीय लाभ, सवलती किंवा फायदे मिळाले नाहीत. आरक्षणा अभावी मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला आहे. मराठा समाजाला संवैधानिक आणि घटनात्मकरित्या टिकणारे ओबीसी आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. रतिकांत पाटील हे तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये जिवंतपणी चिता समाधी घेवून बेमुदत आंदोलनास बसले आहेत. समाधी आंदोलन सुरू करण्याअगोदर रतीकांत पाटील यांची जिवंत अवस्थेत अंत्ययात्रा काढण्यात आली. तळे हिप्परगा गावातील शेकडो मराठा बांधव जिवंत अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.



सोलापुरात मराठा आरक्षणाची धग वाढली : मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत काळाकरता चालू राहणार आहे. चिता आंदोलन सुरू झाल्यामुळे सोलापुरातील मराठा आरक्षणाची धग वाढली आहे. यावेळी चिता आंदोलकर्ते रतिकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छावाचे निखिल गोळे, योगेश पवार, विशाल भोसले, अंकुश पाटील, नीतेश दातखिळे, अमर सुपे, संदीप सिंग, संजय पारवे, विश्वजित चुंगे, गणेश मोरे यांसह मराठा समाज व तळे हिप्परगा ग्रामस्थ, जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौध्द समाज, वडार समाज, कोळी, पारधी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Solapur Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला; सोलापुरात रेलरोको
  2. Chandrashekhar Bawankule : आरक्षणाची आग उद्धव ठाकरेंनी लावली; तर एकनाथ शिंदे विझवत आहेत - चंद्रशेखर बावनकुळे
  3. All Party Meeting on Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीच्या निमंत्रणावरुन ठाकरे गटाचं आधी 'मानापमान' नंतर 'तळ्यात, मळ्यात', 'शेवटी सूर राहू दे'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.