ETV Bharat / state

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक : 'करेक्ट' नियोजनामुळे समाधान आवताडे विजयी, भालकेंकडे अनुभवाची कमतरता

author img

By

Published : May 3, 2021, 1:16 PM IST

भाजपचे समाधान आवताडे यांनी 3730 मतांच्या आघाडीने आमदारकीची विजयी माळ गळ्यात घातली. भारतीय जनता पार्टीचे 'करेक्ट' नियोजन हे समाधान आवताडे यांच्या विजयाचे कारण ठरले. तर भगीरथ भालके यांचा जनाधार कमी पडला

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक :
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक :


पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या हृदयाचे ठोके चुकवणारी आकडेवारी शेवटच्या क्षणाला समोर आली. भाजपचे समाधान आवताडे यांनी 3730 मतांच्या आघाडीने आमदारकीची विजयी माळ गळ्यात घातली. भारतीय जनता पक्षाचे 'करेक्ट' नियोजन हे समाधान आवताडे यांच्या विजयाचे कारण ठरले. तर भागीरथ भालके यांचा जनाधार कमी पडला असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक :
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक : विजयाची माळ समाधान आवताडेंच्या गळ्यात

पंढरपुरात परिचारक गट यांचा मिळालेला भरभक्कम पाठिंबा आवताडे यांच्या विजयासाठी सुखकर ठरला. तब्बल चाळीस वर्षानंतर मंगळवेढा तालुक्याला हक्काचा आमदार मिळाला. भागीरथ भालके यांची जनसामान्य माणसातील तुटलेली नाळ त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. दिवंगत आमदार भारत नानाच्या कर्तबगारी व सहानभूतीतून भगीरथ भालके यांनी लाखांची भरारी घेतली आहे. स्थानिक स्तरातील राष्ट्रवादीतील नेत्यांचे कुरघोडीचे राजकारण महागात पडले. भागीरथ भालके यांच्याकडे राजकीय अनुभवाची कमतरता असल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपाने कमळ फुलवण्यासाठी केला'करेक्ट कार्यक्रम'

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक 17 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणारा भाजपने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे चाचपणी करत असताना मागील निवडणुकीचा बोध घेऊन आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्रित आणण्याची खेळी यशस्वी ठरली. त्यातच मतदारसंघात भाजपाने उभारलेली प्रभावी प्रचार यंत्रणा, मुख्य नेत्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत दिलेली जबाबदारी चोख पार पडली, स्थानिक मुद्यांचे राजकीय भांडवल, मतदार संघातील जिव्हाळ्याच्या मुद्द्यांची योग्य पद्धतीने हाताळणी, स्थानिक नेत्यांचा एकमेकांवर असणारा विश्वास, चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्यात मतविभागणी टाळण्यात यशस्वी, भावणेपेक्षा विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य, याचे योग्य नियोजन केल्यामुळे समाधान आवताडे यांचा विजय सुकर झाला.

पोटनिवडणुकीच्या आधी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या शेती विषयातील निर्णयामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, कारखान्यातील सभासदांचा अक्रियाशीलता हा विषयाचा मुद्दा सचोटीने हाताळण्यात आला. पंढरपूर शहरात आमदार परिचारक यांनी विणलेले कार्यकर्त्यांचे जाळे, मतदानाच्या आधीच्या दोन दिवसांमध्ये भाजपाकडून करण्यात आलेली योग्य नियोजन पद्धती, हे समाधान आवताडे यांच्या विजयासाठी किफायतशीर ठरली. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यापेक्षा भाजपाने केलेले मायक्रो नियोजन निर्णयक ठरले आहे.

भारत नाना भालके यांच्या कर्तृत्वातून भगीरथ भालके यांची लाखांची भरारी

17 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यातच 22 मार्च रोजी अंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित राहून बंडाळी थोपवण्याचा प्रयत्न केला. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची मतदारसंघावर असणारी पकड व त्यांच्या निधनामुळे तयार झालेली सहानभूती राष्ट्रवादीचे उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज महा विकास आघाडीच्या नेत्यांना होता.

राष्ट्रवादीच्या पराभवाची कारणे-

राष्ट्रवादीकडून दिला गेलेला चुकीचा उमेदवार, राज्यातील नेत्यांचे मतदारसंघाकडे असणारे दुर्लक्ष, जिल्ह्यातील जाणकार नेत्यांची वानवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली. तसेच शेवटच्या दोन दिवसांमध्ये कोलमडलेले नियोजन, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जयंत पाटील यांनी प्रचारामध्ये चुकीची ठरवली रणनीती, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाची कमतरता, भगीरथ भालके यांचा जनमानसाची तुटलेली नाळ, पंढरपूर शहर व तालुक्यातील मतदारांना गृहीत धरणे, ऐन निवडणुकीच्या वेळेस महा विकासआघाडी सरकारवरील नाराजगी, मित्रपक्षाच्या उमेदवारांचा फटका, स्थानिक नेत्यांमध्ये उफाळलेली बंडाळी त्यामुळेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. मात्र भारत नाना भालके यांच्या कर्तृत्वातून व सहानभूतीतून भगीरथ भालके यांना लाखाचे मताचा जोगवा मिळाला आहे.

अपक्ष उमेदवारांचा नुसता गाजावाजा...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रस्थापित उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारांनी नुसता गाजावाजा केल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांना डिपॉझिटही वाचता आली नाही, तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे यांना अवघे 1672 मते मिळाली आहेत. तर समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांचा करिष्मा मंगळवेढा तालुक्यातून दिसला नाही. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारांना मतदारांनी चक्क नाकारले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता.

समाधान आवताडे यांच्याकडून मतदारसंघातील विकासाची आशा -

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा भाजपचे समाधान आवताडे यांनी 3733 मतांनी निसटता पराभव केला आहे. भाजपचे समाधान आवताडे यांना एक लाख नऊ हजार 450 तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना एक लाख पाच हजार 717 मध्ये मिळाली आहेत. त्यामुळे आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कामांच्या बाबत विजयी उमेदवार समाधान आवताडे यांच्याकडुन मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न, पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील वाढती बेरोजगारी, अडचणीत असणारे सहकारी संस्था तसेच निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्याचे आवाहन नूतन आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर असणार आहे. त्यातच आमदार प्रशांत परिचारक यांना सोबत घेऊन विकासाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.