Sindhudurg News : कोकणातील महिलांनी सुरू केला कांदळवन सफारी व्यवसाय; परंपरेला फाटा देत निवडला परिवर्तनाचा नवा मार्ग

author img

By

Published : Jan 20, 2023, 11:52 AM IST

women Started fishing business boating

बोट चालवणे सोडाच परंतु महिलांनी बोटीला हात लावणे देखील कोकणात निषिद्ध होते. मात्र या परंपरेला कोकणातील महिलांनी फाटा देत स्वतःच्या परिवर्तनाचा नवा मार्ग निवडला आहे. देवगड तालुक्यातील तारामुंबरीत जलकन्या बचत गटाने उपजीविकेच्या पारंपारिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन नव्या साधनांचा स्वीकार करत महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या प्रगतीचे नवे मार्ग शोधले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

महिलांनी कांदळवन सफारी व्यवसाय केला सुरू

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील महिलांनी जलकन्या बचत गटाच्या माध्यमातून केज कल्चर फिश फार्मिंग, येणाऱ्या पर्यटकांना बोटीच्या माध्यमातून कांदळवन सफारी, कांदळवणामध्ये खेकडा पालन, शिलाने, शिंपले, कालवा आधी मत्स्य व्यवसायातील अंतर व्यवसायावर भर देत शाश्वत उपजीविकेचे मार्ग या ठिकाणी निर्माण केले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना बोटीच्या माध्यमातून खाडीमध्ये सफारी घडवत असताना काया किंगसारखा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या बचत गटाने शासकीय योजनांचा लाभ देखील घेतला आहे.


मच्छीमारांचे अर्थकारण : समुद्री वादळांचा धोका वाढत गेला आणि कांदळवनांचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले. जलकन्या बचत गटाच्या माध्यमातून तारामुंबरी खाडीत कांदळवन संवर्धनाचे कार्य प्रामुख्याने केले जात आहे. बचत गटाच्या मुख्य आधारस्तंभ असलेल्या उषःकला केळुस्कर सांगतात, आम्ही येणाऱ्या पर्यटकांना बोटीतून कांदळवन सफारी घडवतो. पूर्वी आम्हाला कांदळवणातील चीप्पी हीच माहीत होती. चीप्पी सुकली की आम्ही जाळण्यासाठी लाकूड म्हणून घेऊन जात होतो. मात्र याचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रात एकूण 20 जाती असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यापैकी 13 जाती आमच्या खाडीमध्ये आहेत.

कांदळवणाचे संवर्धन : शंभर टक्के ऑक्सिजन देणारी वनस्पती म्हणून कांदळवणाची ओळख आहे. त्याशिवाय समुद्रातील मासे, खेकडे कांदळ वनात आपली अंडी लावतात. कांदळवन हे प्रज्योत्पादनाचे मुख्य केंद्र आहे. ते टिकले तरच किनारी भागातील मच्छीमारांचे अर्थकारण टिकेल असेही त्यांनी सांगितले. कांदळवणात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. तिचे महत्त्व आम्ही लोकांना समजून सांगू लागल्यानंतर आता आमच्याकडे कांदळवणाचे संवर्धन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे.

पर्यटकांना कांदळवणाची सफर : प्रियांका तारी या स्वतः बोट चालवतात. त्या सांगतात, पूर्वीच्या काळात महिलांना बोट चालवणे निषिद्ध होते. पुरुष लोक मच्छीमारी करून मासे घेऊन यायचे आणि महिला ते मासे बाजारात विकायच्या. आज आम्ही बोटीचे सुखाने स्वतः हातात घेतलेत आणि पर्यटकांना कांदळवणाची सफर घडवत आहोत.


महिलांच्या शाश्वत विकासाचे मॉडेल : कांदळवन कक्षाच्या समन्वयक म्हणून मृणाली डांगे या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करतात. महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत या ठिकाणच्या महिलांनी फारच चांगले काम केले आहे. शिणाने पालन, कालवा पालन, खेकडा पालन आणि कांदळवन सफारी अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून उपजीविकेची साधने इथल्या महिलांनी निर्माण केली आहेत. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी महिलांच्या शाश्वत विकासाचे मॉडेल उभे राहिले आहे.


महिला स्वयंपूर्ण : देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तारी सांगतात, चूल आणि मूल या पलीकडे आमच्याकडील महिला गेलेल्या नाहीत. परंतु या परंपरेला आमच्या गावातील महिलांनी फाटा दिला. समुद्रामध्ये मत्स्य दुष्काळ वाढत आहे. पारंपारिक विरुद्ध आधुनिक असा मच्छीमारांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या महिलांनी निवडलेला हा पर्याय अत्यंत चांगला आहे आणि परिणामकारक ठरत आहे. खऱ्या अर्थाने आमच्या महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. त्यांना पुरुषांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. रूढी आणि परंपरांच्या जाळ्यात कैक वर्षे अडकलेल्या कोकणात आता महिलांनी परिवर्तनाची वाट चालायला सुरुवात केली आहे. तारामुंबरी गावात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचा : Sushma Andhare : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मालवणच्या समुद्रात चालवली बोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.