ETV Bharat / state

शेतीपाठोपाठ आवक घटल्याने रायगडातील मासेमारी व्यवसायही धोक्यात

author img

By

Published : Jun 30, 2021, 7:19 PM IST

रायगड मासेमारी
रायगड मासेमारी

शेतीपाठोपाठ आता रायगडातील मासेमारी व्यवसायही धोक्यात येऊ लागला आहे. समुद्रात विविध कारणामुळे मासळी आवक घटल्याने कोळ्याच्या जाळ्यात म्हावर मिळणे आता कठीण झाले आहे.

रायगड - रायगड जिल्ह्यातील समुद्रात वाढलेले जलप्रदूषण, समुद्रात होणारी वादळे, मच्छीमारीत झालेले यांत्रिकीकरण, वाढलेल्या मच्छीमार बोटी, बाहेरील देशातील येणाऱ्या मच्छीमारी बोटी, नष्ट होत असलेले मंगरोज या कारणामुळे कोकणातील मासेमारीवर परिणाम झाला आहे. रायगड जिल्ह्यात मासेमारी उत्पादनात मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. दोन वर्षात रायगड जिल्ह्यात १५ ते २० हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादन घटले आहे. २०२०-२०२१ वर्षात ३८ हजार १९ एवढे मासेमारी उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतीपाठोपाठ आता रायगडातील मासेमारी व्यवसायही धोक्यात येऊ लागला आहे. समुद्रात विविध कारणामुळे मासळी आवक घटल्याने कोळ्याच्या जाळ्यात म्हावर मिळणे आता कठीण झाले आहे.

कैलाश चौलकर

दोन वर्षापासून उत्पादनात घट

रायगड जिल्ह्याला २१० किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे शेती व्यवसायासह मासेमारी हा एक प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन या तालुक्यात समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात दरवर्षी साधारण ४५ हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादन घेतले जाते असे. मात्र २०१६-२०१७ साली ४१ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले होते. त्यानंतर २०१७-२०१८ साली ५३ हजार ३३८ तर २०१८-२०१९ वर्षात ५८ हजार ४४८ मेट्रिक टन अशी विक्रमी वाढ दोन वर्षात झाली होती. मात्र २०१९-२०२० वर्षात पुन्हा मासेमरीत घट होऊन ४१ हजार ७९७ मेट्रिक टन उत्पादन झाले. तर २०२०-२०२१ या वर्षात पुन्हा मासेमारी उतपादनात घट झाली असून ३८ हजार १९ मेट्रिक टन एवढे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून पुन्हा मासेमारी उत्पादनात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

'ही' आहेत कारणे

रायगड जिल्ह्यात दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ समुद्रात झाले. या वादळाचा फटका हा मासेमारीवर जाणवू लागला. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील दूषित पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे तवंग साचल्याने मासे किनाऱ्यावर येत नाहीत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्लास्टिक पिशव्या, बाटल्या हा कचराही समुद्रात टाकला जातो. समुद्रातील मासे हे अंडी घालण्यासाठी मंगरोज वनात येत असतात. मात्र अनेक ठिकाणी मंगरोजही कमी झाले असल्याने त्याचाही फटका बसू लागला आहे. रायगडातील मच्छीमार हे १२ वावपर्यंत मासेमारीसाठी जात असतात. मात्र मासळी आवक घटली असल्याने मच्छीमाराना हवी तशी मासळी मिळत नाही. त्यामुळे मासेमारी उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. पापलेट, सुरमई, रावस, शिंगाडा घोळ, शेवडी यासारख्या माशांच्या उत्पादनात घट झालेली आहे.

हद्द वाढवून देण्याची मच्छीमारांची मागणी

रायगड जिल्ह्यात मासेमारी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. ही गंभीर बाब आहे. समुद्रात होत असलेली वादळे, जलप्रदूषण, समुद्राची धूप कमी होणे, नष्ट होत असलेले मंगरोज, पावसाळ्यात आपल्याकडील मासेमारी बंद असली तरी परदेशातील मासेमारी बोटी मासेमारी करीत असतात. त्यामुळे अंडी टाकणारे मासेही त्याच्याकडून पकडले जातात. त्यामुळे मासेमारी उत्पादन घटत चालले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने गुजरातप्रमाणे बाहेरील मासेमारी बोटींना बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच समुद्रातील १२ वावपेक्षा अधिक हद्द मासेमारीसाठी वाढवून दिली पाहिजे.

  • गेल्या दहा वर्षांतील मत्स्य उत्पादनाची आकडेवारी

    सन मेट्रिक टन
    २०१०/२०११ ४६ हजार ९१९

    २०११/२०१२ ४६ हजार ९१२

    २०१२/२०१३ ४१ हजार ९८४

    २०१३/२०१४ ४२ हजार ८२५

    २०१४/२०१५ ४१ हजार २३९

    २०१५/२०१६ ३९ हजार ५३

    २०१६/२०१७ ४१ हजार ५१४

    २०१७/२०१८ ५३ हजार ३३८

    २०१८/२०१९ ५८ हजार ४४८

    २०१९/२०२० ४१ हजार ७९७

    २०२०/२०२१ ३८ हजार १९
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.