ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ दिवसात 96 परदेशी प्रवासी दाखल; आरटीपीसीआर चाचणीत 1 प्रवासी पॉझिटिव्ह

author img

By

Published : Dec 14, 2021, 12:44 PM IST

Sindhudurg Airport
सिधुदुर्ग विमानतळ

सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथील चिपी विमानतळावर (Chipi Airport) 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत 96 परदेशी प्रवासी(foreign Passengers) दाखल झाले. त्या सगळ्यांची आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR test) करण्यात आली. यात एक प्रवासी पॉझिटिव्ह सापडला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. महेश खलिपे यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात ओमायक्रॉनचा अद्याप रुग्ण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावर परदेशी पर्यटक उतरू लागले आहेत. 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत एकूण 96 परदेशी प्रवासी उतरले. त्यापैकी 7 दिवस पूर्ण झालेल्या 25 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी सावंतवाडी तालुक्यात एका व्यक्‍तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील 7 जणांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी येथे पाठविण्यात आले आहेत. नव्याने पसरणार्‍या ओमायक्रोन या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.


एका व्यक्‍तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
5 डिसेंबरपासून जिल्ह्यातील चिपी विमानतळावर उतरलेल्या 96 प्रवाशांमध्ये वैभववाडी 2, कणकवली 8, देवगड 15, मालवण 5, कुडाळ 10, वेंगुर्ले 15 सावंतवाडी 36, तर दोडामार्ग 5 असे एकूण 96 प्रवासी दाखल झाले. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील 1 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला .

जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण नाही
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसर्‍या लाटे मध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र आता सध्या सक्रिय रुग्णांची संख्या फार कमी आहे. तसेच दर दिवशी घेण्यात येणार्‍या 200-300 टेस्टमध्ये फार कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. गेल्या सहा आठवड्याची सरासरी पाहिली असता पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्के पेक्षाही कमी आहे. जिल्ह्यात ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

परदेशी प्रवाशांना होम क्वारंटाईन
परदेशातून जे नागरिक जिल्ह्यात आलेले आहेत, त्या सर्व प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सतर्कता म्हणून जिल्हावासियांनी मास्क वापरावे तसेच वेळोवेळी सॅनिटाईजर, हँडवॉशचा वापर करावा. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुन्हा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही त्यांनी लवकरात लवकर दुसर्‍या डोसचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.