ETV Bharat / state

Deepak Kesarkar Criticizes Thackeray Group : हिंदुत्वापासून दूर गेलेल्यांना मदतीची गरज; दीपक केसरकर यांची ठाकरे गटावर टीका

author img

By

Published : Jan 22, 2023, 11:03 PM IST

Deepak Kesarkar Criticizes Thackeray Group
दीपक केसरकर

युतीच्या विचारांपासून आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिलेल्या हिंदुत्वापासून जे दूर गेलेत त्यांना मदतीची गरज असल्याचा उपरोधिक टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारानेच मार्गक्रमण करणार. हा आमचा ठाम निश्चय आहे, असेही केसरकर कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हिंदुत्वापासून दूर गेलेल्यांना मदतीची गरज

सातारा - लोकांनी युतीच्या शासनाला निवडून दिलेलं होतं. परंतु, युतीच्या विचारांपासून आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिलेल्या हिंदुत्वापासून जे दूर गेलेत त्यांना मदतीची गरज असल्याचा उपरोधिक टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारानेच मार्गक्रमण करणार. हा आमचा ठाम निश्चय आहे, असेही केसरकर कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली - दीपक केसरकर म्हणाले की, युतीच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारधारेबरोबर राहावे, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु, त्यांनी विचारधारा सोडली आहे. एकच दिवस मला पंतप्रधान करा. मी ३७० कलम रद्द करतो, असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केले. त्याच काश्मीरमध्ये जाऊन कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना कोण मिठी मारत असेल तर त्याच्यासारखा बाळासाहेबांचा अपमान असूच शकत नाही, अशी टीकाही त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

सावरकरांबद्दल अनुद्गार सहन करणार नाही - वैष्णोदेवीची यात्रा दहशतवाद्यांनी रोखल्यानंतर एकही विमान हज यात्रेला जाऊ देणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी देताच वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली, हे संपूर्ण देशाला माहित आहे. असे असताना यात्रा काढणारे महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल अनुद्गार काढतात. हे महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही, अशा शब्दांत केसरकरांनी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली.

जनता विकासाबरोबर राहते - केसरकर म्हणाले, कुणाबरोबरही युती केली म्हणून जनता बरोबर राहत नाही. जनता विकासाबरोबर आहे. मोदी यांना नेता म्हणून जगात मान्यता मिळाली आहे. जी २० चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. ज्याच्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या विचारांच्या विरोधात जाल असाल तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.

गद्दार, लाचार कोण, हे जनतेला कळेल - आदित्य ठाकरेंवर टीका करताना केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरे हे वयाने लहान आहेत. त्यांनी राजकारण बघितलेले नाही. ते स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिनाभरही गेलेले नाहीत. त्यांना राजकारण म्हणजे काय, लोकांची सेवा म्हणजे काय, हे समजणार नाही. त्यामुळे वाईट बोलणाऱ्यांना सौम्य भाषेत उत्तर दिले जाणार. पण, ते उत्तर असे असणार की खरी गद्दारी कुणी केली, पदासाठी कोण लाचार झाले, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल.

हेही वाचा - Prakash Ambedkar On Congress NCP Alliance : काँग्रेस, राष्ट्रवादीला गरज असेल तर, माझ्याशी बोलावे; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.