ETV Bharat / state

Satara Accident : डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने शाळकरी मुलगी जागीच ठार; वाई आगारातील घटना

author img

By

Published : Aug 12, 2023, 10:45 PM IST

Schoolgirl Accident Satara
Schoolgirl Accident Satara

एसटीच्या चाकाखाली सापडून 13 वर्षांची शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना सातारा जिल्ह्यातील वाई एसटी आगारात घडली. श्रावणी विकास आयवळे (रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत मुलीचे नाव आहे. आयवळे कुटुंब मूळचे लातूर जिल्ह्यातील असून कामानिमित्त ते वाई परिसरात स्थायिक झाले आहे.

सातारा: श्रावणी शनिवारी सकाळी शाळेला आली होती. शाळा सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत वाई एसटी आगारात आली. वाई बालेघर ही एसटी (क्र. एम . एच. १४ बी. टी. ४९६) फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली. गर्दीत श्रावणीला धक्का लागल्यामुळे ती खाली पडली. त्यावेळी तिच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेले.


पोलिसांची घटनास्थळी धाव: अपघाताची माहिती मिळताच परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळावर मोठी गर्दी जमली. जमाव प्रक्षुब्ध होण्यापूर्वी गर्दी हटवून अपघाताचा पंचनामा करण्यात आला. तसेच मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला.


एसटी चालक ताब्यात: याप्रकरणी पोलिसांनी तातडीने एसटी चालक जीवन मारुती भोसले (वय ३६, रा. नांदवळ) याला ताब्यात घेतले. दरम्यान, एसटी डेपोत संभाव्य अपघात टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाई आगार व्यवस्थापकांना केली. या अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.


आयवळे कुटुंबाला आर्थिक मदत: या अपघातानंतर वाई आगाराच्या वतीने मृत मुलीच्या कुटुंबाला १० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. मुलीच्या अपघाती मृत्यूने आयवळे कुटुंबाला तसेच मैत्रिणींना जबर धक्का बसला आहे. तिच्या शाळेवर शोककळा पसरली आहे.

मुंबईमध्येही असाच अपघात: शाळेकरी मुलीच्या अपघाताची अशीच एक घटना मुंबईच्या दहिसर पूर्व भागात 7 एप्रिल, 2023 रोजी घडली होती. यामध्ये सागर ज्वेलर्सजवळ एका शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरने चिरडून जागीच मृत्यू झाला होता. विद्या संतोष बनसोडे (8 वर्षे) असे मुलीचे नाव होते. ती खान कंपाउंड रावळपाडा दहिसर पूर्व येथील रहिवासी होती. या घटनेने स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक घटना घडल्या आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल: दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. पाटील म्हणाले की, आम्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कठोर अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल आणि कलम 304 (2) हा खून न करता दोषी मनुष्यवधाचा समावेश आहे.

हेही वाचा:

  1. लातुरात स्कूल व्हॅनच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; १० दिवसांपूर्वीच घेतला होता शाळेत प्रवेश
  2. Dahisar Accident : दहिसरमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलीला डंपरने चिरडले, सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आरोपीला अटक
  3. धुळ्यात ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.