ETV Bharat / state

आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी कोयना धरणातून पाणी सोडणार

author img

By

Published : Aug 14, 2020, 8:27 PM IST

Koyana dam satara
कोयना धरण सातारा

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढून पाण्याची आवक वाढली तर कोणत्याही क्षणी कोयना धरणाचे दरवाजे वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

सातारा - कोयना धरणांतर्गत विभागात अचानकपणे पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणावर घटल्याने शुक्रवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे उचलून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. तर, धरण पायथा वीजगृहातून सकाळी एक व संध्याकाळी दुसरे अशी दोन्ही जनित्रे सुरू करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही जनित्रेही बंद ठेवण्यात आली असून शनिवारी ती कार्यान्वित करण्यात येतील. धरणात सध्या एकूण 83.36 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढून पाण्याची आवक वाढली तर कोणत्याही क्षणी कोयना धरणाचे दरवाजे वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

शुक्रवारी सकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 तर दुपारनंतर धरणाचे सहा वक्री दरवाजे 9 इंचांनी वर उचलून त्यातून 3700 असे दोन्ही ठिकाणाहून प्रतिसेकंद एकूण 5800 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याची तयारी करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात धरणातंर्गत विभागात अचानकपणे पावसाचा जोर कमी होवून पाणी आवकही घटली. पाणी आवक ही प्रतिसेकंद सरासरी 60 ते 82 हजार क्युसेक्सपर्यंत गेली होती पण नंतर ती सरासरी 41 हजार 389 क्युसेक्स इतकी झाल्याने धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी धरण पायथा वीजगृहातील एक जनित्र सुरू करून त्यातून 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. संध्याकाळी दुसरेही जनित्र सुरू करून दोन्ही जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स विसर्ग पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याचा विचार होता. मात्र जनित्रांमध्ये बिघाड झाल्याने सुरू असलेले एक जनित्र बंद ठेवण्यात आले आहे.

शनिवारी या जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पाणी आवक वाढली तर कोणत्याही क्षणी धरणाचे सहा वक्री दरवाजे गरजेनुसार वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने याबाबत संबधितांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात आवश्यक पाणीसाठा झाला आणि पूर्वेकडे पावसाचे प्रमाण, नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन पूराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही कुमार पाटील यांनी सांगितले आहे.

कोयना धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 41 हजार 389 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. येथे आता एकूण उपलब्ध पाणीसाठा 83.36 टीएमसी यापैकी उपयुक्त साठा 78.36 टीएमसी, पाणीउंची 2144.11 फूट, जलपातळी 653.771 मीटर इतकी झाली आहे.

गुरूवार ते शुक्रवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 3.36 टीएमसीने तर पाणी उंचीत 3.9 फुटाने वाढ झाली आहे. चोवीस तासांतील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 98 मिलीमीटर (3032), नवजा 98 (3369), महाबळेश्वर 149 (3376) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोयना पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यवृष्टी होत असलेल्या प्रतापगड येथे 37 (3049) मिलीमीटर, वळवण 30 (4084), सोनाट 58 (2475), बामणोली 25 (2173), काठी 19 (2083) इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनेसह तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांना मात्र पूर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.