ETV Bharat / state

Satara Incidents : स्वातंत्र्यदिनी दोन ह्रदयद्रावक घटना; दोन शाळकरी मुलांसह बाप-लेकीचा बुडून मृत्यू

author img

By

Published : Aug 16, 2023, 3:23 PM IST

Father And Daughter Death
बंधार्‍यात बुडून मृत्यू

देशभर मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना सातारा आणि भाटघर येथून दोन हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये दोन शाळकरी मुले आणि बाप-लेकीचा पोहताना बुडून मृत्यू झाला आहे.

सातारा : मंगळवारी ध्वजारोहणानंतर बंधार्‍यात पोहायला गेलेली दोन शाळकरी मुले बुडाली आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. तर पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या बाप-लेकीचा भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. स्वप्नील सुनील मोरे (वय 15) आणि अमोल शंकर जांगळे, अशी बंधार्‍यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय 45) आणि ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय 13, रा. औंध, पुणे), असे मृत बाप-लेकीचे नाव आहे.



बोगदा परिसरावर शोककळा : स्वप्नील मोरे आणि अमोल जांगळे ही मुले स्वातंत्र्यदिनी शाळेत गेली होती. ध्वजारोहणानंतर दोघेही घरी आले. मात्र, सुट्टी असल्याने दुपारी 12 च्या दरम्यान दोघेही बोगदा परिसरातील जानकर कॉलनीच्या परिसरात असलेल्या बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांवर काळाने घाला घातला. पोहताना बंधार्‍यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ऐन स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे सातारकरांवर शोककळा पसरली आहे.



दुपारी घटना आली उघडकीस : पोहायला गेलेली मुले बराचवेळ घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. दोघेही बंधार्‍यात बुडाल्याचा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले. ट्रेकर्सनी बंधार्‍यात शोध घेऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.



शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन : दोन्ही मुले गरीब कुटुंबातील होती. मुलांनी शिकून मोठे व्हावे, अशी स्वप्ने पाहणार्‍या त्यांच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बोगदा परिसरावर शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.



बाप-लेकीवर काळाचा घाला : पुण्यातील शिरीष मनोहर धर्माधिकारी आणि मुलगी ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी तसेच आणखी चार कुटुंबातील दहा ते बारा पर्यटक हे भाटघर धरण परिसरात स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी आले होते. जयतपाड (ता. भोर) येथील सीमा रिसॉर्टच्या मागील बाजूस असलेला बेबी पूल पाहण्यासाठी हे पर्यटक गेले असताना, शिरीष धर्माधिकारी धरणाच्या खोल पाण्यात उतरले. त्यांनी मुलगी ऐश्वर्यालाही पोहण्यासाठी बोलावून घेतले. पोहत असताना दोघेही पाण्यात बुडाले.



स्थानिकांनी राबवली शोध मोहीम : दुसऱ्या एका घटनेत, धरणात दोन पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी बाप-लेकीचा शोध घेतला. रात्री उशिरा मुलीचा मृतदेह सापडला. मात्र, तिच्या वडिलांचा मृतदेह सापडला नाही. आज सकाळी पोलीस कर्मचारी अशोक खुटवड, सुशांत पिसाळ, अभय बर्गे, वर्षा भोसले, होमगार्ड समीर घोरपडे, पोलीस मित्र मुकेश गुमाणे, दत्ता पवार, एकनाथ बैलकर यांनी शोध घेतला. त्यावेळी शिरीष धर्माधिकारी यांचा मृतदेह सापडला. बाप-लेकीच्या मृत्यूने औंध (पुणे) परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -

  1. Himanshu Mhatre drowned : शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या 22 वर्षीय नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू
  2. Boat drowned in Sea: मुंबईच्या समुद्रात बोट उलटली; 2 मच्छीमार बुडाल्याची भीती, शोध मोहीम सुरू
  3. Youth Drawned In Lake: बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.