ETV Bharat / state

यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे शनिवारी प्रीतिसंगमावर; अजित पवार, सुप्रिया सुळेही येणार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 10:19 PM IST

Updated : Nov 24, 2023, 10:37 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघे प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा ते कराडमध्ये येणार असून कराडमधील नव्या आणि जुन्या विश्रामगृहात ते मुक्काम करणार आहेत.

सातारा - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या (शनिवारी) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कराड दौऱ्यावर आहेत. रात्री उशीरा ते कराडमध्ये येणार असून कराडमधील नव्या आणि जुन्या विश्रामगृहात त्यांचा मुक्काम आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कराड दौऱ्यावर : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आणि कराडमधील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन, अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कराड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १०.३० वाजता त्यांचे कराड विमानतळावर आगमन होईल. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनाचे ते उद्घाटन करतील.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून अपात्रतेची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार, असे गट पडले आहेत. तसेच अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा देखील सांगितला आहे. एकमेकांच्या आमदार, खासदारांना अपात्र करण्याची मागणी दोन्ही गटांकडून लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली आहे. पक्षीय वाद सुरू असल्याने अजितदादा आणि सुप्रिया सुळे उद्या प्रीतिसंगमावर एकत्र येणार का? याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

अजित पवार करणार अभिवादन : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शासनाचा प्रतिनिधी या नात्याने दरवर्षी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री प्रीतिसंगमावर येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करतात. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याने अजितदादांचा कराड दौरा शुक्रवारी सायंकाळी निश्चित झाला. रात्री ११ वाजता मुंबईतून विमानाने निघणार आहेत. ११.४५ वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तेथून मोटारीने कराडला येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील पुण्याहून मोटारीने रात्री उशिरा कराडमध्ये दाखल होणार आहेत.

अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र येण्याची शक्यता कमी : दिवाळीत भाऊ विजेच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय काटेवाडीत एकत्र आले होते. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी भाऊबीज देखील साजरी केली होती. उद्या कराडच्या प्रीतीसंगमावर ताई आणि दादा एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित दादा उद्या सकाळी ७ वाजता प्रीतिसंगमावर जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर लगेच ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे ताई आणि दादा एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे.

हेही वाचा - 'हिंदुहृदयसम्राट' एकच! एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरून संतप्त प्रतिक्रिया; पाहा स्पेशल रिपोर्ट

Last Updated :Nov 24, 2023, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.