ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्याच्या तापमानात वाढ, हापूस होरपळतोय

author img

By

Published : Mar 6, 2021, 3:34 PM IST

रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. गेल्या पाच दिवसात तब्बल दोन वेळा रत्नागिरीच्या तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचला होता.

रत्नागिरी - रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. गेल्या पाच दिवसात तब्बल दोन वेळा रत्नागिरीच्या तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचला होता. या उन्हाच्या तडाख्याचा परिणाम आर्द्रतेवरही होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या उन्हाचा तडाखा फळांचा राजा अर्थात हापूसला बसत आहे. कारण या उन्हांच्या झळांमुळे हापूस होरपळत आहे. त्यामुळे आंबा डागाळण्याचं प्रमाण वाढत आहे. तापमान वाढीची ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

दोन वेळा तापमान ३७ अंशाच्यावर-
मार्च महिन्यात वाढत जाणारा तापमानाचा पारा यावर्षी मात्र फेब्रुवारीच्या अखेरीसच वाढू लागला. २७ फेब्रुवारीला यंदाच्या उच्चांकी ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पारा ३२ ते ३४ अंशापर्यंत होता. मात्र पुन्हा ४ मार्चला म्हणजे चारच दिवसांनी ३७.२ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. या कालावधीत किमान तापमानही १९ ते २४ अंशापर्यंत होते. कमाल , किमान नोंदीमधील फरक १६ अंशाचा आहे. ही परिस्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता असून आर्द्रतेत घट होण्याची शक्यता आहे.
temperature in Ratnagiri district is rising
रत्नागिरी जिल्ह्याच्या तापमानात वाढ
आंब्याला तीव्र उन्हाच्या झळा-
धगधगत्या उन्हाचा सर्वाधिक परिणाम हापूसवर होऊ लागला आहे. तयार झालेला आंबा भाजून गळू लागल्यामुळे बागायतदार त्रस्त झालेला आहे. तसेच ताण वाढल्यामुळे फळगळ सुरू झाली असून आंब्यावर डाग पडले आहेत. भाजलेला आंबा वाया जात असल्याचे अनेक ठिकाणी आढळत आहे. वातावरणातील चढ-उतारामुळे आधीच उत्पादन कमी असल्यामुळे बागायतदारांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कीडरोगांपासून वाचवण्यासाठी फवारणीबरोबरच आंबा भाजू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागत आहे. त्यावरील खर्चाची भर पडणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.