ETV Bharat / state

पालघर : किसान रेल्वेतून चिकुची वाहतूक; 40 वर्षांनंतर आला योग

author img

By

Published : Jan 29, 2021, 5:53 PM IST

sapodilla transport through kisan railway after fourty years in palghar
पालघर : किसान रेल्वेतून चिकुची वाहतूक; 40 वर्षांनंतर आला योग

किसान एक्सप्रेस मालगाडीच्या माध्यमातून येथील 60 टन चिकू दिल्लीकरिता निघाला असून तो २२ तासांत दिल्ली मंडईत दाखल होणार आहे. तब्बल 40 वर्षांनंतर चिकू वाहतुकीसाठी पुन्हा रेल्वेचा वापर केला जाऊ लागल्याने येथील बागायतदारांना जलद गतीने व कमी खर्चामध्ये आपले उत्पादन बाजारपेठेत पाठवण्यास शक्य होणार आहे.

पालघर - डहाणू तालुक्यात उत्पादित होणाऱ्या चिकुची जलदगतीने व किफायतशीर दराने वाहतूक करण्याच्या दृष्टीने येथील बागायतदारांना रेल्वे प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. किसान एक्सप्रेस मालगाडीच्या माध्यमातून येथील 60 टन चिकू दिल्लीकरिता निघाला असून तो २२ तासांत दिल्ली मंडईत दाखल होणार आहे. यामुळे मरगळलीला आलेल्या चिकू व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे.

मिलिंद बाफना यांची प्रतिक्रिया

40 वर्षांनंतर चिकू वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर -

डहाणू तालुक्यात पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रफळावर चिकुची लागवड असून येथील चिकुला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. 1975- 80 च्या सुमारास येथील चिकू रेल्वेद्वारे उत्तर भारतात जात असे. मात्र, नंतर रेल्वे पार्सल सेवेऐवजी येथील बागायतदार दिल्ली, आग्रा, जयपूर, जोधपूर, मथुरा आदी ठिकाणी ट्रकद्वारे चिकुची वाहतूक करू लागले. तब्बल 40 वर्षांनंतर चिकू वाहतुकीसाठी पुन्हा रेल्वेचा वापर केला जाऊ लागल्याने येथील बागायतदारांना जलद गतीने व कमी खर्चामध्ये आपले उत्पादन बाजारपेठेत पाठवण्यास शक्य होणार आहे.

डहाणू परिसरात चिकुचा लिलाव करणारी सात केंद्र -

ट्रकद्वारे चिकुची वाहतूक करताना चार ते पाच रुपये प्रति किलो इतका वाहतुकीचा दर बागायतदारांना आकाराला जात असे. तसेच रस्त्याने फळ दिल्लीला पोहोचण्यासाठी ट्रकला 30 ते 32 तास लागत असत. डहाणू परिसरात चिकुचा लिलाव करणारी सात केंद्र असून येथील व्यापारी व बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेशी संपर्क साधून चिकू वाहतूक करण्यासाठी विशेष मालगाडी पाठवण्याबाबत पाठपुरावा केला. पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) व वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांनी या संदर्भात डहाणू येथे प्रत्यक्षात येऊन बागायतदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्यावर विशेष गाडी सोडण्याचा मार्ग सुचविला.

मध्यरात्री 2 वाजता डहाणू रोड येथून गाडी रवाना -

डहाणू येथून गुरुवारी पहाटे सोडण्यात आलेल्या विशेष किसान रेल्वे सेवेमधून 60 टन चिकू सहा डब्यांमध्ये भरण्यात आला. या गाडीला रवाना करण्यासाठी डहाणूच्या उपविभागीय अधिकारी असीमा मित्तल, तालुका कृषी अधिकारी संतोष, पवार महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे सरचिटणीस मिलिंद बाफना, खजिनदार कृषिभूषण यज्ञेश सावे तसेच रेल्वेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या गाडीत उधवाडा येथून दोन डबे, तर वलसाड अलमसार येथून 16 डब्यांमध्ये चिकू भरण्यात आले. मध्यरात्री 2 वाजता डहाणू रोड येथून रवाना झालेली चिकुची मालगाडी पूर्वी दिल्लीतील आदर्शनगर येथे पोहोचणार आहे.

आठवड्यात दोन दिवस विशेष मालगाडी सोडणे विचाराधीन -

डहाणू भागात सध्यस्थितीत दररोज शंभर टन चिकूचे उत्पादन होत असून ही व्यवस्था कार्यक्षम ठरल्यास दर आठवड्यात सोमवार व गुरुवारी विशेष चिकुची मालगाडी सोडण्याचा विचार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. चिकुच्या हंगामात या भागात २००-२५० टन चिकू उत्पादित होत असून देशाच्या विविध भागात हे फळ पोहचविण्यासाठी रेल्वेची मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा - राज ठाकरे अयोध्येला जाणार, नांदगावकर यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.