ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : नाशकात पुलोद पॅटर्नची अपेक्षा ; छगन भुजबळांना शह देण्यासाठी शरद पवार घेणार बैठक

author img

By

Published : Jul 6, 2023, 11:38 AM IST

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यामुळे उभी फूट पडली आहे. मात्र अजित पवार यांना शरद पवारांचे खंदे समर्थक समजल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांनी साथ दिली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना शह देण्यासाठी शरद पवार हे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार अजित पवार यांच्या गटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात पुलोद पॅटर्नला भरभरून साथ देणाऱ्या नाशिक जिल्ह्याला साद घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ये नाशकात येत आहेत. शरद पवार हे 8 जुलै रोजी नाशिकच्या पक्ष कार्यालयात बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्या विरोधात आघाडी उघडली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पुलोदच्या काळात सगळे मतदार संघ शरद पवारांच्या पाठीशी : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमादरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवळ यांच्यासह आमदार नितीन पवार, दिलीप बनकर हे उपस्थित असल्याने ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार सरोज अहिरे आणि माणिक कोकाटे येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. दरम्यान नाशिक जिल्हा व राष्ट्रवादीचे अनेक वर्षांपासून समीकरण आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. पुलोदच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना पाठींबा मिळाला होता. नाशकात आपली ताकद पुन्हा दाखवण्यासाठी शरद पवार आठ जुलैला नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील अजित पवार गटात : नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आमदारांपैकी सर्वच्या सर्व अजित पवार यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. आता संघटनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी देखील तोच मार्ग निवडल्यामुळे एकीकडे ज्या नाशिक जिल्ह्याने शरद पवार यांना भरभरून साथ दिली, तेथे आता त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचे दिसून आले आहे. अजित पवार गटातील भुजबळ समर्थक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, संजय खैरनार, किशोर खैरनार आदी प्रमुख पदाधिकारी देखील अजित पवार गटात दाखल झाले आहेत.

शरद पवार समर्थक मुंबईकडे रवाना : मुंबईत शरद पवार गटाकडून यशवंतराव चव्हाण सभागृहात तर अजित पवार गटाकडून भुजबळ नॉलेज सिटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज या स्वतंत्र बैठका होत आहेत. या बैठकीला जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून शरद पवार समर्थक हे मुंबईकडे रवाना झालेत. अजित पवार समर्थक मोठया संख्येने जाणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.

आमदार कोकाटे मेळाव्यात निर्णय जाहीर करणार : सत्तेत असलो तर विकास कामांसाठी अडचण येत नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण करायचे असेल तर सत्ता महत्त्वाची असल्याचे सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार कोकाटे यांनी स्पष्ट केले. कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. तरी देखील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी रविवारी सिन्नरला मेळावा घेणार असल्याचे कोकाटे समर्थकांनी सांगितले. तसेच सोमवारी अजित पवार आणि कोकाटे यांची मुंबईत भेट झाल्याची ही चर्चा आहे.

आठ जुलैला शरद पवार यांची येवल्यात सभा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार असून यातील सगळे आमदार हे अजित पवार गटात आहेत. मात्र असे असले तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे. अजित पवार पाठोपाठ छगन भुजबळ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या बंडाला थंड करण्यासाठी खुद्द शरद पवार येवल्यामध्ये आठ जुलै रोजी सभा घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माणिकराव शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis Update: अजित पवारच पक्षाचे अध्यक्ष, आम्हाला अपात्रतेची भीती नाही-छगन भुजबळ
  2. NCP Executive Meeting Today: शरद पवार यांची आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक, काय होणार निर्णय?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.