ETV Bharat / state

Social Media Account Hacking : पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; अनेकांकडे पैशाची मागणी

author img

By

Published : Aug 17, 2023, 10:31 PM IST

नाशिक जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगाराने अनेकांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी सायबर पोलिसात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

Social Media Account Hacking
सोशल मीडिया

नाशिक : महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही सायबर गुन्हेगारी मोडीत काढून जनजागृती करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून 1 हजार तरुणांची सायबरदूतची फौज तयार करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा घातल्याच्या घटना वारंवार घडत असताना आता या सायबर गुन्हेगारांनी थेट सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या नावाने बनावट सोशल अकाउंट तयार करून अनेकांकडे पैशाची मागणी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.


फोन करून पैशाची मागणी: नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारां विरुद्ध दणक्यात कारवाई करणारे मंगलसिंग सूर्यवंशी, वन विभागातील अधिकारी एस. एम. भंडारी यांच्यासह पाच ते सहा अधिकाऱ्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करून कोणाला मॅसेज तर कोणाला फोन करून पैसे मागितल्याचे प्रकार घडले आहे. यातील बहुतांशी पोलीस अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. कोणी नाशिक तर कोणी नाशिकच्या बाहेर राहत असून त्यांच्या नावाने कधी पैशाची तर कधी औषधासाठी मदत मागितली जात आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


औषधासाठी मागणी: सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त यांच्या सोशल मीडियाचे खाते हँग झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना मेसेज जात आहेत. त्यातील काहींनी सूर्यवंशी यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एकाच वेळी प्रकृतीची आणि इतर चौकशी होत असल्याने सूर्यवंशी यांना शंका आली. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट विचारले की, तुमच्या नावाने सोशल मीडियावरून आजारी पडल्याने पैशाची गरज असल्याचे मेसेज येत आहे. यावर सूर्यवंशी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावरील खाते हॅक झाल्याचे सांगून कोणीही त्याच प्रतिसाद देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.


घरातील फर्निचर कमी किमतीत: एका तक्रारदार अधिकाऱ्याचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक केल्यानंतर त्यातील संपर्कातील काही मित्रांचा नंबर मिळवत हॅकर्सकडून थेट मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या व्हाट्सअप व फेसबुकच्या खात्यावर तक्रारदाराच्या नावाने त्यांच्या घरातील फर्निचर विक्री असल्याचे फोटो शेअर केले. त्यात सुरुवातीला पाच लाखाचे फर्निचर अवघ्या दीड लाखात तर काहींना एक लाखात देत असल्याचे भासवले. त्यावरून काहींनी चांगले फर्निचर बघून लागलीच संबंधितांना कॉल केला. तत्पूर्वी त्याच पोस्टवर किंमत ठरवल्यानंतर समोरच्याकडून लागलीच 50 हजार अथवा 25 हजार अकाउंटवर टाकल्यास फर्निचर पाठवले जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम खात्यावर टाकण्याचे सांगितले. यातून काहींनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केल्यावर असे काहीही नसून अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारांना तक्रारदारासह त्यांच्या संपर्कातील मंडळीही चक्रवले असून सायबर पोलीस याबाबत तपास करत आहे.

1 हजार सायबरदूतची फौज: सध्या सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप तसेच ऑनलाइन पध्दतीचा वापर करून होणारे आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशात काही शिक्षित नागरिक वगळता अनेकांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबत अज्ञान आहे. त्यामुळे असे नागरिक सोशल मीडियाच्या गुन्हेगारीला बळी पडत आहे. यासाठी नाशिक पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्यासाठी 1 हजार सायबर दूत यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित सायबरदूत यांना सायबर पोलिसांकडून प्रशस्तीपत्र आणि सायबरदूतचा बॅच देण्यात येत आहे. हे सायबरदूत शहरातील शाळा, महाविद्यालय, कंपनी, संस्था, रहिवाशी परिसरात ठिकाणी सायबर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करतात. याद्वारे मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन साधने या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करणार आहे.

हेही वाचा:

  1. Cyber Emissaries In Nashik: नाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अनोखा उपक्रम; पोलीस आयुक्तांनी उभी केली सायबरदूतांची फौज
  2. Devendra Fadnavis News : सायबर गुन्हेगारी मोडून काढणार - देवेंद्र फडणवीस
  3. Juice Jacking Scam : स्मार्टफोन चार्जिंगला लावताच बँक खाते होईल साफ; 'अशी' घ्या तुमच्या मोबाईलची काळजी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.