ETV Bharat / state

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाज आक्रमक; नांदेडात आंदोलक रस्त्यावर

author img

By

Published : May 7, 2021, 10:39 AM IST

नांदेडात आंदोलक रस्त्यावर
नांदेडात आंदोलक रस्त्यावर

शहरातील आसना पुलाजवळील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मारुती वाघ मित्र मंडळाकडून चक्काजाम करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या मधोमध वाहनांचे टायर जाळण्यात आले.

नांदेड : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयाचा निषेध करत नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. आसना पूल येथे टायर जाळत मराठा संघटनांनी रास्ता रोको केला. तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होतं. यामुळे नागपूर-हैदराबाद रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

नांदेडमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद नांदेडात पाहायला मिळाले आहेत. शहरातील आसना पुलाजवळील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मारुती वाघ मित्र मंडळाकडून चक्काजाम करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या मधोमध वाहनांचे टायर जाळण्यात आले. जवळपास तासभर झालेल्या चक्काजाम आंदोलनामुळे आसनाच्या दुतर्फा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनातील तरुणांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

लोह्यात अर्धनग्न आंदोलन
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. लोहा येथील भाजी मंडई परिसरात मुख्य रस्त्यावर मराठा समाजातील युवकांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. लोहा शहरातील विविध संघटनांनी यात सहभागी होऊन अर्धनग्न आंदोलन केलं.

हदगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
हदगाव येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि हदगाव तहसील येथे निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षण न्यायालयात असताना राज्य सरकारने व केंद्र सरकारने संबंधित विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. यास संपूर्णपणे महाराष्ट्रातील राज्यकर्ते, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असून या दोन्ही सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मराठा समाजाच्या लढ्यास नाना भाऊ पटोले युवा मंचचे तालुका अध्यक्ष गजानन दळवी यांनी पाठिंबा दिला.

राजकारणासाठी मराठा आरक्षणाचा वापर केल्याचा आरोप
कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर मराठा समाजाचे रौद्ररुप दाखवून देण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सरकारला इशारा दिला. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून आक्रमक होण्याचे संकेत दिले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मराठा समाजाचा आतापर्यंत वापर केला व मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम दोन्ही सरकारने केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.