ETV Bharat / state

Renuka Devi : नऊशे वर्ष जुने मंदिर; जाणून घ्या, माहूरच्या रेणुका देवीचा इतिहास

author img

By

Published : Feb 23, 2023, 11:01 PM IST

Updated : Feb 24, 2023, 6:13 AM IST

Renuka Devi
Renuka Devi

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुकदेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो जाणून घेऊयात तिथला इतिहास

नांदेड : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक असणारे शक्तीपीठ म्हणून माहूरचे श्री रेणुकादेवी मंदिर ओळखले जाते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुकदेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो.

महाराष्ट्रातील दुसरे शक्तिपीठ : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. रेणुकादेवीचे हे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे, असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा

आहे.

काय आहे आख्यायिका? : एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला जीचे नाव रेणूका असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.

माता रेणुका सती गेली : पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. वणवण भटकत, अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले.

उदे ग अंबे उदेच्या गजर : महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण व मूळपीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावरील उत्सहात दरवर्षी साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात 'उदे ग अंबे उदे'च्या गजरात सकाळी मंदिर गाभाऱ्यात पहिल्या माळेला सकाळी सहा वाजल्यापासून सनई वादन, वेदमंत्र घोषात ,मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ केला जातो. पहिल्या दिवशी अनेक राजकीय नेते रेणुकामातेचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा करतात.

घटस्थापना अशी करतात : सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान श्री रेणुकामातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरून त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून, कुंडावर मातीचा कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोताल याच उसाचे धांडे उभारुन आणि त्याआधारे कलशावर पुष्पहार माळा बांधून सकाळी 11ते 11.30 च्या दरम्यान घटस्थापना करण्यात येते. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करण्यात येतो. घटस्थापनेनंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणि प्रथम जिल्हा यांच्या हस्ते आरती करण्यात येते. घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात येते. परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती कुमारिका पूजन केली जाते.

हेही वाचा - Frontotemporal Dementia : अद्यापही सापडले नाहीत फ्रंटो टेम्पोरल डिमेंशिया आजारावर उपचार, टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

Last Updated :Feb 24, 2023, 6:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.