ETV Bharat / state

Nitin Gadkari Extortion Case : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए ऐवजी नागपूर पोलीस दाखल करणार जयेश पुजारीविरोधात आरोपपत्र

author img

By

Published : Jun 28, 2023, 12:07 PM IST

Nitin Gadkari Extortion Case
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन त्यांना धमकी देत खंडणी मागण्यात आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी जयेश पुजारीला बंगळुरुच्या कारागृहातून अटक केली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. मात्र नागपूर पोलीसच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहेत.

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेऐवजी (NIA) नागपूर पोलीसच जयेश पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. नागपूर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जयेश पुजारीने मागितली खंडणी : या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करुन धमकी देण्यात आली होती. कर्नाटक राज्यातील बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीने दोनदा धमकीचे फोन करून ही खंडणी मागितली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे नागपुरात दाखल केले आहेत. तर या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर एनआयएने बंगळुरू येथे एक गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाने एनआयएची मागणी फेटाळली : नागपूर पोलिसांनी दाखल केलेले दोन गुन्हे आणि एनआयएने दाखल केलेला बंगळुरू येथील गुन्हा यांचा एकत्रीकरण करण्याची मागणी एनआयएने नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने तांत्रिक व कायदेशीर बाबींचा विचार करून एनआयएची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आता नागपूर पोलीसच या प्रकरणी न्यायालयात चार्जशीट दाखल करणार असल्याची माहिती आहे.

काही दिवसांची मुदत मागणार ? : न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी नागपूर पोलीस न्यायालयात काही दिवसांची मुदत मागणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई एनआयए याप्रकरणी बंगळुरुमध्ये जयेश पुजारी आणि त्याचे साथीदार कॅप्टन नजर अफसर पाशा आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याची स्वतंत्र चार्जशीट बंगळुरू न्यायालयात दाखल करणार आहे.

'पीएफआय'च्या संपर्कात होता जयेश : जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आणखी एका कट्टरवादी पदाधिकऱ्याच्या तो संपर्कात असल्याची माहिती तपासात पुढे आली. या कट्टरवादी पदाधिकाऱ्याने जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे उघड झाले आहे.

खंडणी प्रकरणाचा तपास एनआयएकडे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी व खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला अटक केली आहे. सध्या जयेश हा नागपूर कारागृहात आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. संवेदनशील प्रकरण असल्याने हा तपास एनआयएकडून सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी उपमहानिरीक्षक व अधीक्षक दर्जा असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी प्रकरणाशी संबंधित नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून सात तास माहिती घेतली.

जयेश पुजारीला बेळगाव कारागृहातून अटक : नितीन गडकरी यांना धमकावून खंडणी मागितल्याने या प्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी या कुख्यात गुंडाला बेळगाव कारागृहातून अटक केली. बेळगाव कारागृहातूनच जयेश पुजारीने नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी जयेश पुजारीच्या मुसक्या आवळल्या होत्या. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबाबतचे महत्त्वाचे धागेदोर मिळाले आहेत.

हेही वाचा -

  1. Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए अधिकारी नागपुरात दाखल
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावात, बंगळुरुमधील तरूणीबाबत महत्वाची माहिती समोर
  3. Nitin Gadkari News : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; खंडणीसाठी वापरलेले दोन सिमकार्ड जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.