ETV Bharat / state

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज - नाना पटोले

author img

By

Published : Aug 9, 2021, 4:06 PM IST

देशात लोकशाही वाचवण्याची गरज असून यासाठी सर्वांनी एकत्र येत लढा देण्याची गरज असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी 'भाजप चले जाओ' असा नाराही दिला.

nana patole latest news
लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज

मुंबई - ऑगस्ट क्रांती दिना निमित्त मुबंईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नाना पटोले यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देशात लोकशाही वाचवण्याची गरज असून यासाठी सर्वांनी एकत्र येत लढा देण्याची गरज असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी 'भाजप चले जाओ' असा नाराही दिला.

'लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची'

जुलमी, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ साली ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाओ’चा नारा दिला गेला आणि देशभर हे आंदोलन उभे राहिले. ‘चले जाव’च्या आंदोलनाने इंग्रज सत्तेला हादरा बसला आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होऊन देशात लोकशाही व्यवस्था आली. या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. परंतु स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही. त्या विचारसणीचे लोक आज सत्तेत असून मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांनी लावला आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

'लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य आज धोक्यात' -

देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्ष संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मागील काही वर्षात ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. २०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे. शेतकरी, तरुण, व्यापारी वर्गाला खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आले आणि संविधान व्यवस्था बदलण्याचे काम केले जात आहे. देश बलशाही बनवण्यासाठी वाटचाल सुरु असताना ते स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करत आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे ही यावेळी नाना पटोले म्हणाले.

'खरी लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हान' -

दरम्यान, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘चले जाओ’चा नारा दिला आणि त्यानंतर हे आंदोलन देशभर पसरले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आपल्याला देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देश व लोकशाही व्यवस्था वाचवायची गरज आहे असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. तर आजचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलेला दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसौनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पहायला मिळत आहे. देशासाठी त्यावेळी असलेली मुल्ये व तत्वे यांची तुलना करता आज त्या मुल्ल्यांना, तत्वांना तिलांजली दिली जात आहे. लोकशाही धोक्यात आहे. आज ज्या पद्धतीने कारभार सुरु आहे, तो काय कामाचा, आता खरी लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हान सर्वांसमोर असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

हेही वाचा - Quit India Movement : 'ऑगस्ट क्रांती दिना'ला 80 वर्ष पूर्ण; वाचा नेमकं त्यावेळी काय घडलं...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.