ETV Bharat / state

उरण ते खारकोपर लोकलचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 7:01 AM IST

uran kharkopar local train inauguration by pm narendra modi
उरण ते खारकोपर लोकलचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

PM Narendra Modi : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचं शुक्रवारी (12 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तर, उरण ते खारकोपर या दरम्यान लोकल सेवेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

नवी मुंबई PM Narendra Modi : महत्त्वाकांक्षी अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (12 जानेवारी) झालं. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुमारे दीड लाखाहून अधिकच्या संख्येनं उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. तसंच या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या 'लेक लाडकी' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाभार्थी कुटुंबियांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणं विविध प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन, पायाभरणी करण्यात आली. यामध्ये उरण-खारकोपर लोकल सेवेचाही समावेश होता.

उरण-खारकोपर लोकल सेवेचा शुभारंभ : उरणकरांचं स्वप्न असलेल्या उरण ते नवी मुंबई मार्गावरील खारकोपर-उरण या दुसर्‍या टप्प्यातील लोकल सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल सेतू लोकार्पण सोहळ्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. यातील पहिल्या टप्प्यात नेरूळ, बेलापूर ते खारकोपर अशा 12.5 किमी अंतरापर्यंत सेवा सुरू होती. या सोहळ्यात उर्वरित उरणपर्यंतच्या 14.3 किमी लांबीच्या दुसर्‍या टप्प्यातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला.


अटल सेतू हा विकसित भारताची झलक : पंतप्रधान मोदी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, "2014 मध्ये माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्याआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ मी काही क्षण बसलो. या गोष्टीला 10 वर्षे झाली. या 10 वर्षांत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरतांना पाहिलंय. अटल सेतू या भावनांचं प्रतिबिंब आहे. तरुणांच्या उज्ज्वल भविष्याचा रस्ता अटल सेतूसारख्या रस्त्यांवरुन जातो. अटल सेतू हा विकसित भारताची झलक आहे. विकसित भारतात गती प्रगती होईल, अंतर कमी होईल. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. निरंतर आणि अडथळ्यांविना सर्व सुरळीत राहील."


भूकंपाचे झटके विरोधकांना बसणार : "अटल सेतू हा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल आहे. या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव असणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकार्पण ही या पुलाच्या बळकटीची खात्री देणारी आहे. हा पूल 22 किमी मार्गाचा आहे. भूकंपाचे धक्केही हा पूल सहन करू शकतो, मात्र येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भूकंपाचे झटके विरोधकांना बसणार आहेत. शिवडी-न्हावा शेवा हा विजयाकडं घेऊन जाणारा महामार्ग आहे. अन्याय आणि अत्याचाराचा अंत करण्यासाठी प्रभू रामाच्या सेनेनं समुद्र सेतू बांधला होता. हा सागरी सेतूही अहंकारी लोकांचा अहंकार मोडणारा ठरेल यात शंका नाही", असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


...म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला सर्वांत जास्त आनंद आहे की, "अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. याचं भूमिपूजनही त्यांनी केलं होतं. या देशात मोदी राज आलं म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. अटल सेतूची संकल्पना 1973 मध्ये मांडली गेली होती. 1982 मध्ये जेआरडी टाटा कमिटीनं अलाईन्टमेंट केली, पण 40 वर्षांत काहीच झालं नाही. मोदी पंतप्रधान बनले तसा देशाचा मिजास बदलला, काम करण्याच्या पद्धती बदलल्या आणि मग अनेक गोष्टी वेगानं चालू लागल्या", असा दावा त्यांनी केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपले विचार मांडत मोदी सरकारच्या पाठबळानं राज्यातील महायुती सरकार पुढं जात असल्याचं नमूद केलं.

यांची होती उपस्थिती : या सोहळ्यास व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जपानचे राजदूत हिरोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. गल्लीतल्या रेल्वे स्थानकांचं उद्घाटनसुद्धा आता पंतप्रधान करतायेत; अरविंद सावंतांचा टोला
  2. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका; संजय राऊतांची आगपाखड
  3. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी करणार 11 दिवसांचा खास उपवास; ऑडिओ शेअर करत देशवासियांना दिला 'हा' संदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.