ETV Bharat / state

बारावी पास रिक्षावाला शेअर मार्केटमध्ये चांगली कमाई करू शकतो मग तुम्ही का नाही?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 5:42 PM IST

Special story of Vishal Paikrao
विशाल पाईकराव

Special story of Vishal Paikrao : कोणीतरी आपल्याला काम देईल याची वाट न पाहता करिअरची आणि रोजगाराची नवी दिशा स्वत: शोधून आपलं करिअर कसं धडवायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशाल पाईकराव. जाणून घ्या काय आहे त्याच्या करिअरची कहाणी.

विशाल पाईकराव

मुंबई : Special story of Vishal Paikrao सध्या संसदेचं आणि राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बेरोजगारीचा मुद्दा चर्चेला येतोय. दरवेळी नेते या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राजकारण करत असतात. मात्र या राजकारणात पडून कोणीतरी आपल्याला काम देईल याची वाट पाहात राहील तो आजचा तरुण कुठला. आज अनेक जण सोशल मीडियावर ब्लॉगर झाले आहेत. यामध्ये त्यांनी करिअर केलं आहे. त्याच सोबत एक करिअरची आणि रोजगाराची नवी दिशा सध्या तरुणांसमोर आहे ती म्हणजे शेअर मार्केट. अशाच एका बारावी पास रिक्षावाल्याची धडपडीची कहाणी आहे. ज्याने आपल्याला कोणीतरी जॉब देईल आणि मग आपण काहीतरी करू याची वाट न पाहता स्वतःच्या हिंमतीवर आपलं विश्व निर्माण केलं आणि सध्या तो इतरांना देखील मार्गदर्शन करत आहे. या तरुणाचं नाव आहे विशाल पाईकराव.


कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय : विशाल एक बारावी पास सर्वसामान्य कुटुंबातील 24 वर्षांचा मुलगा आहे. बारावीनंतर त्याने पुढच्या शिक्षणासाठी अर्ज केला. बीएच्या प्रथम वर्षाला असतानाच आपल्या शिक्षणाचा खर्च कुटुंबावर नको, आपण काम करत शिकावं यासाठी त्याने एका कुरिअर कंपनीत कामाला सुरुवात केली. स्वतः मेहनत करायला सुरुवात केल्यावर विशालला अनेक गोष्टींची जाणीव व्हायला लागली. त्याच काळात परिस्थिती बदलली आणि जबाबदारी वाढली. त्याच ओढतानीत शिक्षण सुटलं आणि विशाल पूर्ण वेळ कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून रुजू झाला. तिथे त्याला मार्गदर्शन करणारे सहकारी लाभले. त्यांनी विशालला शेअर मार्केट बद्दल माहिती दिली आणि त्याच्या मनात शेअर मार्केट शिकण्याची आवड निर्माण झाली. इथूनच विशालच्या एक ट्रेडर आणि मार्गदर्शक बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.


सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केट शिकण्यास सुरुवात : विशाल पाईकराव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, "मी आत्तापर्यंत विविध ठिकाणी काम केलं. एका सुपर मार्केटमध्ये कामाला होतो, आरे येथील फिल्म सिटीमध्ये देखील मी सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. पण, मला माझ्या काही जुन्या सहकाऱ्यांनी शेअर मार्केट बद्दल माहिती दिली आणि मी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केट शिकण्यास सुरुवात केली. कामावरून आल्यावर मी एक व्हिडिओ पाहून त्याचा अभ्यास करायचो. असं करत वर्षभर मी फक्त शेअर मार्केटचा अभ्यास केला. याच काळात शिकता-शिकता मी ट्रेडिंग करायला सुद्धा सुरुवात केली होती. त्यामुळे वाचन आणि टिटोरियल सोबतच माझं प्रॅक्टिकल सुद्धा होत होतं. याचा मला आता काही प्रमाणात फायदा होत आहे."


नफ्यातून घेतली सेकंड हॅन्ड रिक्षा : पुढे बोलताना विशाल यांनी सांगितलं की, "सोशल मीडियावर शेअर मार्केट बद्दल माहिती देणारे व्हिडिओ पाहताना कधी कधी मनातून खूप वाटायचं आपण देखील याचे क्लासेस लावायला हवेत. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने हे मनातले विषय फक्त मनातच राहिले आणि मी सोशल मीडियावर माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी दहा हजार रुपये यामध्ये गुंतवले त्यातून मला बऱ्यापैकी नफा झाला. माझं वर्षाचं गणित पाहता मला एका वर्षात साधारण एक लाखाचा नफा या शेअर मार्केट मधून होत होता. मग आला कोविड. कोविडमुळे सर्वकाही बंद झालं. माझा देखील जॉब गेला. मग घर चालवायला काहीतरी एक भक्कम आधार हवा यासाठी मी शेअर मार्केटमध्ये झालेल्या नफ्यातून तीस हजाराची एक सेकंड हॅन्ड रिक्षा घेतली. आता मी रिक्षा देखील चालवतो आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग देखील करतो."


सेकंड इन्कम सोर्स : विशाल आता रोज सकाळी लवकर रिक्षा बाहेर काढतो आणि मुंबईकरांना सेवा देतो. मात्र जेव्हा शेअर मार्केट ओपन होतं त्यावेळी विशाल रिक्षा बाजूला लावतो. आपल्या गाडीमध्ये ठेवलेला लॅपटॉप बाहेर काढतो आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. हा विशालचा सध्याचा दिनक्रम झालेला आहे. इतक्यावरच न थांबता लोकांनी देखील शेअर मार्केटमध्ये यावं आणि एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून या शेअर मार्केटकडे पहावं असं विशालला वाटतं. यासाठी त्याने आपल्या रिक्षामध्ये देखील शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करावं याचे काही नियम आणि तक्ते लावले आहेत. जेणेकरून प्रवाशांना यातून प्रेरणा मिळेल. विशाल सध्या सोशल मीडियावर देखील फेमस असून तो आपल्या शेअर मार्केटच्या प्रवासाबद्दलचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो. सध्या त्याचे 35k फॉलोवर्स आहेत.

हेही वाचा :

  1. दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या
  2. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम, सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
  3. तहसीलदार हे आमदार सुहास कांदेंच्या दबावाखाली काम करतात-सुषमा अंधारे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.