ETV Bharat / state

Shiv Sena Women Leaders : मनीषा कायंदेनंतर आता कोणाचा नंबर? शिवसेना महिला आघाडीत चालू काय आहे?

author img

By

Published : Jun 19, 2023, 8:11 PM IST

एकेकाळी अत्यंत सक्रिय असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या सध्या नाराज असल्याचे चित्र आहे. या महिला नेत्या आता पक्षातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. शिवसेनेतील आघाडीच्या महिला नेत्यांची अशी घुसमट का होते आहे? जाणून घेऊया राजकीय तज्ञांकडून.

Shiv Sena Women Leaders
शिवसेना महिला नेत्या

विवेक भावसार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला सातत्याने गळतीचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेचे अनेक बिनीचे शिलेदार शिंदे गटात जाऊन विसावले आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. नेत्यांना केंद्रीय यंत्रणांकडून दाखवली जाणारी भीती आणि काही नेत्यांची महत्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. सद्यस्थितीत ठाकरे गटाकडून अजूनही अनेक नेते शिंदे गटात दाखल होताना दिसत आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अस्वस्थ? : शिवसेना महिला आघाडी मुंबईतील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसते. या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिनी म्हणून नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, छाया कोळी, मनीषा कायंदे यांची नावे समोर येतात. मात्र शिवसेनेतील या महिला आघाडीच्या नेत्याही आता अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे अस्वस्थ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. किशोरी पेडणेकर यांचाही आवाज दबला आहे, तर मनीषा कायंदे यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.

महिला नेत्यांना काम नाही : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणतात की, शिवसेनेमध्ये महिला आघाडीच्या नेत्यांना काहीच काम नसते. भाजप सारख्या पक्षांमध्ये प्रवक्त्यांनी कोणत्या विषयावर काय मते मांडायची याबाबत चर्चा होते. मात्र शिवसेनेत अशी कुठलीही कार्यप्रणाली नाही. त्यामुळे जर एखादे आंदोलन नसेल तर महिला नेत्यांना कसलेच काम उरत नाही. गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेतील महिला नेत्यांना अभावानेच संधी मिळाली आहे. त्यातच सुषमा अंधारे याच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेच्या आधीच्या महिला नेत्या बाजूला सारल्याचे दिसून येत आहे. महिला नेत्यांची ही खदखद गेल्या एक-दीड वर्षापासून दिसून येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून मनीषा कायंदे या अखेर शिंदे गटात सामिल झाल्या आहेत.

नीलम गोऱ्हे आणि किशोरी पेडणेकरही नाराज? : शिवसेनेच्या उपनेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सुद्धा अस्वस्थ आणि नाराज असल्याचे चित्र आहे. त्या सुद्धा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच मुबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा सध्या नाराज असून, त्यांच्या मागे असलेल्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास कारणीभूत ठरू शकतो, अशी शक्यता भावसार यांनी व्यक्त केली आहे.

'शिवसेनेत महिलांना मान नाही' : याविषयी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे म्हणतात की, 'उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत महिलांना कुठलही मान दिला जात नाही. तुम्हाला पक्षप्रमुखांशी कधीही बोलता येत नाही. तुमची मते मांडता येत नाहीत. त्यामुळे शिवसेनेतील अनेक महिला नेत्यांची नेहमीच घुसमट होते. ज्याप्रमाणे मनीषा कायंदे बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्या आहेत, त्याचप्रमाणे शिवसेनेतील अन्य महिला नेत्याही लवकरच खऱ्या शिवसेनेत दाखल होतील.'

हेही वाचा :

  1. Manisha Kayande criticizes Uddhav Thackeray: मनीषा कायंदे यांचा शिंदे गटात प्रवेश, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली सर्वात मोठी जबाबदारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.