ETV Bharat / state

शिर्डीच्या स्वच्छतेसाठी भाविकांकडून कर वसुलीचा ठराव; शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध

author img

By

Published : Mar 7, 2021, 6:31 AM IST

Updated : Mar 7, 2021, 8:16 AM IST

Shirdi
भाविकांनाकडून कर वसुलीचा ठराव

साईबाबा संस्थानास बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मिळणाऱ्या दानाचा आकडा लाखोंच्या घरात आहे. तरीही संस्थांनाकडून शिर्डी नगरपंचायतला दिला जाणारा स्वच्छता निधी बंद केला आहे. त्यामुळे आता शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेशकर सुरू केला जाणार आहे.

शिर्डी - सबका मालिक एक हा महामंत्र देणाऱ्या साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश कर आकारण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतीने केला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी म्हणून हा कर आकारला जाईल. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापूर्वी बंद झालेले नाके पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीच्या या ठरावाला शिवसेना आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

कोट्यवधीचे उत्पन्न असलेल्या साई संस्थानाने बंद केला स्वच्छता निधी-

साईबाबा संस्थानास बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मिळणाऱ्या दानाचा आकडा लाखोंच्या घरात आहे. तरीही संस्थांनाकडून शिर्डी नगरपंचायतला दिला जाणारा स्वच्छता निधी बंद केला आहे. त्यामुळे आता शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेशकर सुरू केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापूर्वी बंद झालेले टोल नाके पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपने हा ठराव मांडला आहे. स्थानिक महाविकास आघाडीचे नेते आगामी निवडणूक समोर ठेवून या ठरावाला विरोध करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केला आहे.

भाविकांनाकडून कर वसुलीचा ठराव; शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध

सत्ताधारी भाजपने प्रवेश कराचा मांडला ठराव -

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतला गावाच्या स्वच्छतेचा मोठा भार पडत असतो. या आधी साईभक्तांना शिर्डीत येताना प्रवेशकर द्यावा लागत होता. मात्र भक्तांना हा त्रास होऊ नये यासाठी 2005 मध्ये शिर्डी स्वच्छतेसाठी नगरपंचायतला लागणारा निधी साई संस्थानतर्फे देण्याचा निर्णय घेतला. शिर्डी संस्थानचे तात्कालीन अध्यक्ष कै. जयंत ससाणे यांनी हा निर्णय घेतला होता. तेव्हापासून दर महिन्याला साईसंस्थानकडून नगरपंचायतला 42 लाख रूपये दिले जात होते. मात्र लाॅकडाऊनच्या काळात गेल्या मे महिन्यापासून साईसंस्थानकडून दिला जाणारा निधी अचानक बंद केला गेला. त्यामुळे नगरपंचायतीला स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचं असा प्रश्न निर्माण झाला. तसेच दर महिन्याला स्वच्छता करण्याचा ठेका दिलेल्या कंपनीला पेमेंट करणं अवघड झाले. साई संस्थानने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक निधी देणं बंद केल्याने आता प्रवेशकर गोळा करण्याचा ठराव नगरपंचायतने केला असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.

शिवसेना राष्ट्रवादीचा विरोध-

शिर्डी नगरपंचायतवर भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत नगरपंचायतची अडचण दूर करण्यासाठी आता साईभक्तांकडून प्रवेशकर आणि स्वच्छता कर आकारणी सुरू करण्यात येणार आहे. नगरपंचायतने राज्यसरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर कर गोळा करण्यासाठी नाके सुरू होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी हा ठराव मांडला आहे. पण या ठरावाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोध केला आहे.


शिर्डीच्या प्रवेशद्वारावर टोलनाके सुरू हो़ऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या नाक्यांना परवानगी देणार का? आणि शिर्डीच्या स्वच्छतेचा तिढा सुटणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दोन वेळा स्वच्छतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी शिर्डी आगामी काळातही स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी राहणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Last Updated :Mar 7, 2021, 8:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.