ETV Bharat / state

Maharashtra Politics: राज्यात रंगले पोस्टर वॉर; राज ठाकरे, आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी, राजकीय चर्चांना उधाण

author img

By

Published : Jun 14, 2023, 9:02 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर वॉर रंगले आहे. अजित पवार यांच्यापासून चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक वरीष्ठ नेत्यांची नावे पोस्टरवर झळकली आहेत. आता माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव देखील या स्पर्धेत उतरले आहे. दोघांच्या ही वाढदिवसानिमित्त राज्यभरात पोस्टरबाजी करत पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पोस्टरबाजी रंगल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics
कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी

मुंबई : लोकसभा, विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजताच, राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. विविध पक्षांकडून मतदारसंघातील चाचपणी सोबतच मोट बांधणीला देखील सुरुवात झाली आहे. महत्वाच्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आपल्या नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून असे पोस्टर लावले जात आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरात असेच पोस्टर झळकले होते. उलटसुलट चर्चा यावेळी रंगल्या होत्या.



वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी बॅनरबाजी : आता बॅनरबाजीच्या शर्यतीत मनसे आणि युवासेनाही उतरली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ही भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. दादर शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवणारा सत्तेचा रिमोट कंट्रोल, असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे यांचे वरळी, नाशिक, कोल्हापूर आदी भागात बॅनर लावले आहेत. दोघांच्या ही वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. राजकीय विरोधक असलेल्या काका-पुतण्याचा उल्लेख कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री केल्यानंतर राजकीय गोटात आता चर्चेला उधाण आले आहे.


शिवसेना आणि भाजपची युती : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघात भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा पोस्टरबाजी करण्यात आली होती. शिवसेना आणि भाजपची युती होती. मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा ठाकरेंकडून करण्यात आला होता. मात्र, भाजपकडून मुख्यमंत्री पद शिवसेनेला सोडण्यास नकारघंटा दर्शवल्यानंतर युती तुटली. परंतु, आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले पोस्टर त्यावेळी चांगले चर्चेला आले होते.

हेही वाचा :

  1. BJP Free Maharashtra: भाजपमुक्त महाराष्ट्र बनविण्याचा संकल्प - एच. के. पाटील
  2. People Preference For CM: राज्यातील जनतेचा कौल कोणाला? सत्ताधारी, विरोधकांचे दावे प्रतिदावे
  3. Eknath Shinde : 'फोटो असो किंवा नसो, लोकांच्या मनात आम्हीच' ; जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.