ETV Bharat / state

Navrati 2023: शारदीय नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील महालक्ष्मी मंदिर सज्ज, 'अशी' आहे भाविकांसाठी व्यवस्था

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 8:09 AM IST

Shardiya Navratri 2023
मुंबईतील महालक्ष्मी मंदिर

Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर सज्ज झालं असून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे.

मुंबई Shardiya Navratri 2023 : मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. ललिता पंचमी तसंच अष्टमीच्या दिवशी भाविकांची संख्या तीन लाखांपेक्षा अधिक असते. त्यामुळं वृद्ध, अपंग व गर्भवती स्त्रियांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली असून व्हीआयपी पासधारकांना सुरक्षा रक्षक व्यवस्थेतून जावं लागणार आहे. दरम्यान, यंदा भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व प्रकारची तयारी मंदिर व्यवस्थापनं आणि पोलीस प्रशासनानं केली असल्याची माहिती महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी दिली आहे.


कसा असेल मंदिरातील कार्यक्रम? : आजपासून (15 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून महालक्ष्मी मंदिरामध्ये घटस्थापना होऊन सकाळी ७.०० वा. आरती घेण्यात आली. गुरुवारी (१९ ऑक्टोबर) ललिता पंचमी पूजन असून त्या दिवशी उपांग ललिता व्रत करण्यात येणार आहे. तर २२ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध अष्टमी-दुर्गा अष्टमी असून अष्टमी हवनास सायंकाळी ४.३० वाजता प्रारंभ होऊन रात्री ८.०० वाजता पूर्णाहुतीनंतर आरती होणार आहे. तसंच विजया दशमीला (२४ ऑक्टोबर) सकाळी ७.०० वा. आरती आणि नैवेद्याच्या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याचं कांबळी यांनी सांगितलंय. धुपारती सायंकाळी ६.१५ ते ६.४० पर्यंत तर ७.२० ते ७.५५ दरम्यान आरती होईल. हे सर्व धार्मिक कार्यक्रम मंदिराचे मुख्य पुजारी प्रकाश साधले, सुयोग कुलकर्णी, अरूण वीरकर, बाळकृष्ण जोशी, सुरेश जोशी, केतन सोहनी, महेश काजरेकर, गिरीश मुंडले यांच्या हस्ते होणार आहेत.


मंदिर परिसरावर सीसी टीव्हीची नजर : नवरात्रोत्सवामध्ये मंदीराच्या आवारात तसंच हाजी अली पर्यंतच्या परिसरात ६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत. तसंच मंदिरामध्ये ५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. गेली अनेक वर्षे वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट याठिकाणी कार्यरत आहे. तर अनिरूद्ध अ‍ॅकॅडमी, नागरी सेवा दल, होमगार्डस् यांची सुद्धा यावेळी मदत घेतली जाते. देवळामध्ये काही डॉक्टरांच्या टीमसह एक रुग्णवाहिका सकाळ-संध्याकाळ तैनात असेल.


काय आहे व्यवस्था? : भाविकांनी पुजेचं साहित्य धातुच्या थाळीमध्ये आणू नये. तर प्लॅस्टीकची थाळीचा नाहीतर छोट्या टोपल्यांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलंय. भाविकांसाठी बँक ऑफ इंडियापर्यंत पेंडॉल उभारला असून त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची तसंच सरबताची व्यवस्था करण्यात आलीय. महालक्ष्मी मंदिरातर्फे जीवन ज्योत ड्रग्ज बँक, नाना पालकर स्मृती केंद्र परळ आणि पिपल्स मोबाईल ताडदेव येथील डायलेसीस सेंटरसाठी मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबापुरीची धनदेवता असलेल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. त्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टीनं गावदेवी पोलीस ठाण्यातर्फे वर्षभर विशेष बंदोबस्त ठेवला जातो. वाहतुकीची व्यवस्था सांभाळण्यासाठी ताडदेव वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीस पोलिसांचे पथक कार्यरत असणार आहे. तर बेस्ट तर्फे भाविकांसाठी बसेसची सोय करण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. Shardiya Navratri 2023 : यंदाच्या नवरात्रीत 'हे' आहेत नऊ रंग; देवी दुर्गा होईल प्रसन्न...
  2. Sharadiya Navratri 2023 : या नवरात्रीत करा आपल्या राशीनुसार माता दूर्गेची पूजा; जाणून घ्या
  3. Shardiya Navratri 2023 : लवकरच सुरू होतोय नवरात्री उत्सव; जाणून घ्या देवी दुर्गा कोणत्या वाहनावरून करणार आगमन...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.