ETV Bharat / state

Mumbai Crime : कॅसिनो खेळण्यासाठी घरफोडी; साकीनाका पोलिसांनी आरोपीच्या झारखंडमधून आवळल्या मुसक्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 11:27 AM IST

Mumbai Crime
संग्रहित छायाचित्र

Mumbai Crime : मुंबई शहरात कॅसिनो खेळण्यासाठी आरोपी घरफोडी करत असल्याचं उघड झालं आहे. या आरोपीच्या साकीनाका पोलिसांनी झारखंडमधील रांची शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. अभिमन्यु अर्जुन गुप्ता असं पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचं नाव आहे.

मुंबई Mumbai Crime : साकीनाका परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला झारखंड राज्यातील रांची इथून साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. अभिमन्यु अर्जुन गुप्ता ( वय - 31 वर्षे ) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी अभिमन्यू गुप्ता हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीकडून घोरपडी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कॅसिनो खेळण्यासाठी अभिमन्यु अर्जुन गुप्ता हा मुंबईत घरफोडी ( Mumbai Crime ) करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

कॅसीनो खेळण्यासाठी घरफोडी : साकीनाका पोलीस ठाण्यात घरफोडी प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅसीनो खेळण्यासाठी घरफोडी करुन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस झारखंडमधील रांची इथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. या गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचंही दत्ता नलावडे यांनी यावेळी सांगितलं.

घर फोडून साडेतीन लाखाचा ऐवज नेला चोरुन : तक्रारदार मोहम्मद युसुफ अब्दुल रहीम शेख हे साकीनाका परिसरातील पंचशील सोसायटी इथं राहतात. 5 सप्टेंबरला रात्री 11 ते 6 सप्टेंबर पहाटे 4:00 वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून चोरी केली. यावेळी दरोडेखोरांनी साडेतीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी केल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस तपास करत होते.

पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून केलं अटक : साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी झारखंडमधील रांची इथं गेल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे साकीनाका गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे व पथक हे रांचीला रवाना झाले. रांची रेल्वे स्टेशन अभिमन्यु अर्जुन गुप्ता याला ताब्यात घेऊन रांचीमधील चुटिया पोलीस ठाण्यातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 76 ग्रॅम वजनाचे 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या अभिमन्यु अर्जुन गुप्ता याच्या विरोधात यापूर्वी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात एकूण 13 चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime: दरोडा टाकण्याआधीच मेरठच्या दरोडेखोराला मुंबईत अटक
  2. Mumbai Crime News : मुंबईत माफिया अतिक अहमदच्या नावानं गोळीबार, जमीन हडपण्याचा प्रयत्न
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.