ETV Bharat / state

फ्रान्समध्ये अडकलेलं विमान मुंबईत उतरल्यानंतर सीआएसएफकडून चौकशी, प्रवाशांनी काय दिली प्रतिक्रिया?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 1:57 PM IST

Updated : Dec 26, 2023, 3:12 PM IST

Mumbai Airport news
Mumbai Airport news

Alleged Donkey flight : फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर उतरवण्यात आलेलं विमान अखेरीस आज मुंबईत पोहोचलं. सर्व प्रक्रियेदरम्यान आम्ही फ्रान्स पोलिसांना तपासात सहकार्य केलं, अशी प्रतिक्रिया भारतात परतलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडिओ

मुंबई Alleged Donkey flight : मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये उतरवण्यात आलेलं विमान अखेरीस आज (मंगळवार, २६ डिसेंबर) पहाटे मुंबई विमानतळावर पोहोचलं. संयुक्त अरब अमिरातीहून निकारागुआची राजधानी म्यानागुआला जाणारं एअर बस ए ३४० हे विमान फ्रान्समधील व्हॅट्री या विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. मानवी तस्करीच्या संशयावरून उतरवण्यात आलेल्या या विमानात ३०३ प्रवासी होते. यातील सर्वाधिक प्रवासी हे गुजरातचे आहेत.

विमानातून मानवी तस्करीचा संशय : रोमानियन चार्टर कंपनी लिजंड एअरलाइन्सच्या मालकीचं असलेलं हे विमान संयुक्त अरब अमिरातीहून ३०३ प्रवाशांना घेऊन निकारागुआ येथे चाललं होतं. मात्र फ्रान्समधील व्हॅट्री या विमानतळावर इंधनासाठी थांबा घेतलेल्या या विमानाला तेथेच थांबवण्यात आलं. या विमानातून मानवी तस्करी करण्यात येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या विमानातील प्रवाशांची आणि त्यांच्या ओळखपत्रांची कसून चौकशी करण्यात आली. विमानातील प्रवासी कोणत्या कारणासाठी, कुठून कुठे प्रवास करत होते, याचीही चौकशी करण्यात आली.

२७६ प्रवासी मुंबईत आले : चौकशीनंतर ३०३ प्रवाशांपैकी २७६ प्रवासी मंगळवारी पहाटे मुंबई विमानतळावर दाखल झाले. उर्वरित २५ प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज केला आहे. तर दोन संशयित प्रवाशांना पुढील तपासासाठी फ्रान्समध्येच थांबवून घेण्यात आलंय. फ्रान्समधील संघटित गुन्हेगारी विरोधी पथकानं या प्रकरणाची चौकशी केली. यातील काही प्रवासी हे बेकायदेशीररित्या स्थलांतर करीत असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली होती. त्या आधारे पुढील चौकशी करण्यात आली.

भारतीय दूतावासाचं एक पथक विमानतळावर : यादरम्यान प्रवाशांना आधी विमानातच राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांना विमानतळाच्या लाऊंजवर राहण्याची परवानगी देण्यात आली. भारतीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फ्रान्समधील भारतीय दूतावासाचं एक पथक तातडीनं फ्रान्समधील विमानतळावर पोहोचलं होतं.

फ्रान्स पोलिसांना तपासात सहकार्य : या विमानातील भारतीय प्रवाशांकडे आवश्यक परवानगी आणि व्हिसा होता का? या प्रवाशांना जर चौकशी करून सोडून देण्यात आलं, तर मानवी तस्करीचा आरोप चुकीचा होता का? याबाबत विमानतळ प्राधिकरणाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, याविषयी प्रवाशांशी संपर्क साधला असता त्यांनी फार काही सांगितलं नाही. आम्ही फ्रान्सच्या पोलिसांना चौकशीत सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला जाऊ दिलं अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. मानवी तस्करीचा संशय असलेले विमान मुंबईत परतले, २७५ प्रवाशांची चार दिवसानंतर फ्रान्समधून सुटका
Last Updated :Dec 26, 2023, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.