ETV Bharat / state

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोरेगावमधील 2 हजार 500 घरांची म्हाडा काढणार लॉटरी

author img

By

Published : Dec 15, 2020, 6:23 AM IST

MHADA
म्हाडा

मुंबई किंवा राज्यात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांचे लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे असते. गेल्या आठवड्यात म्हाडाच्या पुणे मंडळाने पुण्यातील 5 हजार 647 घरांसाठी लॉटरी जाहीर करत सर्वसामान्यांना मोठी खूशखबर दिली होती. आता नव्या वर्षात मुंबईकरांसाठी देखील लॉटरी काढली जाणार आहे.

मुंबई - मायानगरी मुंबईमध्ये परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा असते. ही प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने लॉटरी काढण्याच्या प्राथमिक तयारीला अर्थात घरांच्या शोधमोहिमेला सुरूवात केली आहे. त्यानुसार गोरेगाव येथील चालू बांधकाम प्रकल्पातील 2 हजार 500 घरांचा लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे. तर, घरांचा आकडा आणखी वाढवण्यासाठी विखुरलेली घरे शोधली जात असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

जुन 2019 नंतर आता 2021 मध्ये लॉटरी?

म्हाडाच्या मुंबईतील घराच्या लॉटरीची प्रतीक्षा सर्वाधिक असते. या लॉटरीला भरघोस प्रतिसादही मिळतो. महत्वाचे म्हणजे मुंबईसारख्या महागड्या शहरात म्हाडाच्या माध्यमातूनच परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही लॉटरी खूप महत्वाची ठरते. त्यामुळेच अधिकाधिक कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरवर्षी लॉटरी काढण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असतो. काही अपवाद वगळले तर मागील 10-12 वर्षात दरवर्षी लॉटरी निघाली आहे. मात्र, 2020 हे वर्षे याला अपवाद ठरले आहे. कारण या वर्षी ही लॉटरी निघालेली नाही. याअगोदर जून 2019 मध्ये लॉटरी निघाली होती. आता नव्या वर्षात म्हणजेच 2021 मध्येच लॉटरी निघणार आहे.

म्हणून लॉटरीचा 'घाट'?

मुंबईत लॉटरीसाठी घरेच नसल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुढचे दोन वर्षे तरी लॉटरी नाही, असे याआधीच जाहीर केले होते. पण आता मात्र, लवकरच म्हणजे नव्या वर्षात लॉटरी काढण्याची वेळ मुंबई मंडळावर आली आहे. याचे कारण म्हणजे नुकतीच पुणे मंडळाची लॉटरी जाहीर झाली असून यावेळी मुंबईतील घरांच्या लॉटरीची विचारणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रसार माध्यमांनी केली होती. तेव्हा आव्हाड यांनी मुंबईतील घरांसाठी लवकरच लॉटरी काढू असे जाहीर केले. ही घोषणा झाली पण आता लॉटरीसाठी घरे आणयची कुठून असा प्रश्न मुंबई मंडळासमोर उभा ठाकला आहे. म्हणूनच आता मंडळाने घरांची शोधाशोध सुरू केली आहे.

विखुरलेली घरे शोधण्यास सुरुवात -

घरांचा शोध घेण्यास आता मुंबई मंडळाने सुरुवात केली आहे. मुंबईत सध्या जे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत, त्यातील कोणती आणि किती घरे आहेत याचा आढावा घेतला आहे. या आढाव्यात गोरेगाव, कुसुम शिंदे प्लॉटवर सुमारे 7 हजार घरे बांधण्यात येत आहेत. यातील सुमारे 2 हजार 500 घरे लॉटरीत उपलब्ध होऊ शकणार असल्याचे म्हसे यांनी सांगितले. तर खासगी बिल्डरकडून शेअरिंग प्रकल्पातून 50 ते 60 घरे मिळाली आहेत. याचाही समावेश लॉटरीमध्ये होऊ शकतो. तसेच आणखी घरे वाढवण्यासाठी विखुरलेल्या घरांचा ही शोध घेतला जात असल्याचेही म्हसे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.