ETV Bharat / state

Maharashtra Politics : सत्ता संघर्षानंतर राज्यात नवी समीकरणे? जाणून घ्या...

author img

By

Published : May 6, 2023, 5:26 PM IST

राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय जाहीर होणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास राज्यात काही नवे सत्ता समीकरणे जुळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यासाठी भाजपकडून नव्या शक्यता पडताळल्या जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Politics
महाराष्ट्राचे राजकारण

प्रसाद देशपांडे, राजकीय विश्लेषक

मुंबई : राज्यात शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर आता नव्या राजकीय समीकरणांची पडताळणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच शरद पवारांनी राजीनामा देऊन या चर्चांमधील हवाच काढून टाकली. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतही धुसपूस सुरू झाली असून आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार की नाही, याबाबत साशंकता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणातील निकाल येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय गणितच पूर्णपणे बदलून जातील असे जाणकारांचे मत आहे.

निकाल सत्ताधारी गटाच्या विरोधात गेल्यास काय? : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात जर शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अपात्र ठरून सरकार आपोआपच कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला नव्याने समीकरणे जुळवावी लागतील. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन भाजपने आपला प्लान बी तयार ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवार यांनी अजूनही आपल्याकडेच लोकमत आहे आणि अशा स्थितीत जर अजित पवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांच्यासोबत फारसे लोक जाणार नाहीत, हे आपल्या राजीनामा नाट्यातून सिद्ध केल्याची प्रतिक्रिया राजकीय तज्ञ प्रसाद देशपांडे यांनी दिली केली.

भाजपचा प्लान बी काय आहे? : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांना जनतेची सहानुभूतीही मिळते आहे. त्या तुलनेत शिंदे गटाला जनतेतून किती प्रतिसाद मिळेल, याबाबत भाजपला खात्री वाटत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला सोबत घेतल्याने किती फायदा होईल याची पडताळणी भाजपकडून सुरू आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना देशपांडे यांनी सांगितले की, नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांचे संबंध अधिक चांगले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे सुत जुळणार नाही हे स्पष्ट दिसत असल्याने भारतीय जनता पक्ष आता नव्या पर्यायांचा विचार करताना दिसत आहे. त्यानुसार नितीन गडकरी यांना मुख्यमंत्रीपदी आणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मदत आगामी काळात घेता येईल का? त्यासाठी विकास, हिंदुत्व, सावरकर अशा काही समान मुद्द्यांवर एकत्र येऊन चर्चा करता येते का?, याची चाचणीही भाजपतर्फे सुरू करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Eknath Shinde In Army : '..तर कदाचित आज मी सैन्यात असतो', एकनाथ शिंदेंनी सांगितली सैन्याचे ट्रेनिंग सोडल्याची कहाणी
  2. Eknath Shinde : मराठी बहुभाषिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री चोळणार मीठ, कर्नाटकात करणार भाजपचा प्रचार
  3. Karnataka Election 2023 : काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले, खर्गे यांच्या हत्येचा कट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.