ETV Bharat / state

Breaking News: तृतियपंथीयांना पोलिस दलात भरतीसाठी शारीरिक चाचणीचे निकष निश्चित - गृह विभाग

author img

By

Published : Mar 15, 2023, 6:24 AM IST

Updated : Mar 15, 2023, 7:59 PM IST

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

19:56 March 15

तृतियपंथीयांना पोलिस दलात भरतीसाठी शारीरिक चाचणीचे निकष निश्चित - गृह विभाग

नागपूर - गृह विभागाने पोलीस दलात तृतियपंथीयांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीचे निकष निश्चित केले आहेत. राज्य सरकारने अशा उमेदवारांसाठी एक नवीन विंडो तयार करणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते. ट्रान्सजेंडर श्रेणी अंतर्गत, उमेदवारांनी स्वत:ला पुरुष किंवा महिला म्हणून ओळखणे आवश्यक आहे आणि त्यानुसार ते शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहू शकतात, असे आदेशात म्हटले आहे.

19:48 March 15

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियरने पत्नी मुलाची हत्या करुन स्वतः केली आत्महत्या

पुणे - एक 44 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याची पत्नी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा बुधवारी पुणे शहरातील औंध परिसरात त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील पतीने आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि नंतर गळफास घेतला, असे पोलिसांनी सांगितले. सुदिप्तो गांगुली, त्यांची पत्नी प्रियांका आणि मुलगा तनिष्का अशी मृतांची नावे आहेत.

19:43 March 15

एनसीबीची नवी मुंबईत कारवाई, सव्वा किलो चरसबरोबर 40 लाखांची रोकड जप्त

मुंबई - अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (NCB) मुंबई विभागीय युनिटने नवी मुंबईतून 1.17 किलो चरस जप्त केले. तसेच एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.त्याच्या ताब्यातून 40.45 लाख रुपये रोख आणि 970 ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

19:24 March 15

शासकीय कॉन्ट्रॅक्टर एम.पी. पवार यांचा मृतदेह घानेवाडी जलाशयात आढळल्याने खळबळ

जालना - येथील शासकीय कॉन्ट्रॅक्टर एम. पी. उर्फ मधुकर परशुराम पवार (वय 51) यांचा मृतदेह घानेवाडी जलाशयात आढळला आहे. पवार यांनी आत्महत्या केली की घातपात अशी चर्चा नागरिकात सुरू झाली आहे. एम. पी.पवार हे काल मंगळवारी (दि. 14) सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास मोबाईल व खिशातील सर्व सामान काढून ठेवून गाडी घेऊन घरातून बाहेर पडले. त्यांच्या घरच्यांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचे भाऊ रामेश्वर पवार यांनी कदीम जालना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घानेवाडी येथील जलाशयात काही नागरिकांना एक बेवारस मोटार सायकल व मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

19:18 March 15

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या 14 कलमी मागण्या

मुंबई - शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सरकारपुढे त्यांच्या 14 कलमी मागण्या मांडल्या. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित होते. अतुल सावे आणि आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊ अशी सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे, अशी माहिती राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

19:04 March 15

कर्नाटकात महाराष्ट्राच्या योजना, भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर सिद्धरामय्या यांनी ठेवले बोट

बंगळुरू - महाजन आयोगाच्या अहवालानुसार कर्नाटकात असलेल्या ८६५ गावांमध्ये महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. आमच्याकडे असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र सरकारला आरोग्य योजना आणायच्या आहेत. असे जर असेल तर मग असा प्रश्न पडतो की भारत सरकार अस्तित्वात आहे काय, असा सवाल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे.

18:59 March 15

छत्तीसगडमध्ये घरांसाठी विधानभवनाला भाजप कार्यकर्त्यांचा घेराव, जमाव हुसकावण्यासाठी अश्रुधुराचा वापर

रायपूर - छत्तीसगड राज्यातील पीएमएवाय अंतर्गत गरिबांसाठी घरांची मागणी करत विधानभवनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला. रायपूरमध्ये छत्तीसगड विधानसभेच्या बाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पाण्याचा फवारा मारून हुसकावले. तसेच यावेळी आंदोलकांना हुसकावण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

18:54 March 15

डॉ. दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई - माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

18:51 March 15

ITC रॅकेटचा पर्दाफाश, दोघांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुंबई - CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालय, रायगड यांनी 19.07 कोटी रुपयांच्या बनावट ITC रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पॅशन प्ले इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना पनवेल येथील न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

17:51 March 15

वंदे भारत एक्सप्रेस मुंबईत आणल्याबद्दल मोदींचे आभार - सुरेखा यादव

मुंबई - वंदे भारत एक्सप्रेस मुंबईत आणल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते असे आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वप्रथम १९८९ मध्ये रेल्वे चालवली होती. त्यावेळेपासून आपल्याला पाठिंबा मिळत आहे. आता आपण आता वंदे भारत एक्सप्रेस चालवत असल्याचा अभिमान आहे असे त्या म्हणाल्या.

17:45 March 15

बारामतीमध्ये ड्रेनेज नाल्यात गुदमरून चार जणांचा मृत्यू

पुणे - बारामतीमध्ये ड्रेनेजच्या पाईपमध्ये गुदमरून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला प्रवीण आटोळे नावाचा माणूस पाइप साफ करण्यासाठी आत गेला असता तो बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडीलही आत गेले. मात्र तेही बेशुद्ध पडले. त्याच्या पाठोपाठ २ जणही आत गेले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

17:40 March 15

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची उद्या H3N2 संदर्भात महत्वपूर्ण बैठक - तानाजी सावंत

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या H3N2 संदर्भात बैठक होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

17:32 March 15

भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले शिवसेनेने नाही - उद्धव ठाकरे

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका करताना हिंदूत्व भाजपने सोडले की शिवसेनेने याचा वास्तविक विचार करायला पाहिजे असा सवाल केला. ते म्हणाले की भाजपने रथयात्रा सुरू केली तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्याकडे फक्त 2 खासदार होते. अडवाणी त्यांचा चेहरा होता. पण जेव्हा सरकार स्थापन करायचे होते आणि त्यांना जयललिता आणि इतरांचा पाठिंबा हवा होता, तेव्हा धर्मनिरपेक्षतेसाठी इतर पक्षांनी अडवाणींच्या चेहऱ्याला विरोध केला आणि अटलजी पंतप्रधान झाले. मग हिंदू धर्म कोणी सोडला, शिवसेना की भाजप? हे जनतेनेच ठरवावे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

17:25 March 15

पुण्यात पाकिस्तानी नागरिकाला अटक

पुणे - शहर पोलिसांच्या विशेष शाखेने मोहम्मद अमान अन्सारी नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. तो 2015 पासून भवानी पेठ परिसरात बेकायदेशीरपणे राहत होता. चौकशीदरम्यान, त्याच्याकडे बनावट कागदपत्रांचा वापर करून बनवलेला भारतीय पासपोर्ट देखील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ४२०, ४६८, ४७१, परदेशी कायदा १९४६ चे कलम १४ आणि पासपोर्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

16:05 March 15

ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, 'स्वतःला पक्ष म्हणण्याचा अधिकार शिंदेंना कुणी दिला' सिब्बल यांचा प्रतिवाद

नवी दिल्ली - ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी शिंदे गटाचा युक्तीवाद मुळापासूनच चुकीचा असल्याचा जोरदार दावा आज सुप्रीम कोर्टात केला. सिब्बल म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलेच कसे. घटनात्मक दृष्ट्या एकनाथ शिंदे होतेच कोण असा सवाल सिब्बल यांनी विचारला. शिंदे हे गटनेते असल्याचा युक्तिवाद करण्यात आला, मात्र कोणत्या कायद्यानुसार ते गटनेते झाले असाही सवाल त्यांनी केला. सिब्बल म्हणाले की, विधिमंडळाती सदस्य स्वतःच्या हाती पक्षाचे अधिकार घेऊ शकत नाहीत. त्यांनी आसाममध्ये बसून दुसर्‍या पक्षाचे (भाजपचे) सार्वजनिकरित्या समर्थन आहे असे सांगण्यात आले. भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे असे ते जाहीरपणे सांगत होते. तसेच आसामात बसून आपणच राजकीय पक्ष असल्याप्रमाणे घटना बदलत होते. हे सर्व घटनाबाह्य होते. सिब्बल म्हणाले की, शिंदे गटाचे वकील कौल यांनी असा युक्तिवाद केला की आम्हीच पक्ष आहोत. ते म्हणाले आम्हीच शिवसेना आहे. विधिमंडळातील फक्त ३४ सदस्य आपणच शिवसेना असल्याचे कोणत्या घटनात्मक आधारावर म्हणू शकतात? असा सवालही सिब्बल यांनी केला. त्यावेळी त्यांना शिवसेना म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती का? असाही प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. सिब्बल पुढे म्हणाले की, शिवसेना हा एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे. मी राजकीय पक्ष आहे असे शिंदे कसे म्हणू शकतात? त्याला कोणताही घटनात्मक आधार नाही, ही बाब सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. एखादा लोकप्रतिनिधींचा गट असा दावा करु शकतो, त्याला कायद्याचा आधारही देता येईल. मात्र लोकशाहीला मारक आणि घटनात्मकदृष्याही चुकीचे ठरेल हे लक्षात आल्याने दहाव्या परिशिष्ठाच्या परिच्छेद 3 अंतर्गत येणारे यासंदर्भातील प्रावधान हटवण्यात आले आहे, याची नोंद कोर्टाने घ्यावी असा जोरदार प्रतिवाद शेवटी सिब्बल यांनी केला. आजची सुनावणी संपली आहे आता उद्या अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.

15:27 March 15

एखाद्या नेत्याची ओळख ही त्याचा पक्ष असते, सभागृहातील प्रतिनिधीत्व नंतर मिळते - सिब्बल

नवी दिल्ली - कपील सिब्बल यांचा जोरदार प्रतिवाद सुरू आहे. त्यांनी सांगितले की एखाद्या नेत्याची ओळख ही त्याचा पक्ष असते. त्यामुळे सरकार उभारते किंवा पडते ते पक्षांच्या तीन प्रकारच्या परिस्थितीमध्ये घडत असते. एक म्हणजे सर्वात मोठा पक्ष, निवडणूकपूर्वी युती, निकालानंतरची आघाडी. यामध्ये या सर्व गोष्टी पक्ष पातळीवर घडत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदार करत असतात. त्यांची ओळख पक्ष म्हणून असते. इतर कोणतीही ओळख त्यांना नसते, असे स्पष्ट मत सिब्बल यांनी मांडले.

15:19 March 15

सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण, ठाकरे गटाचा शेवटचा प्रतिवाद सुरू

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आता त्याचा शेवटचा प्रतिवाद ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल करत आहेत. तसेच त्यांच्यानंतर डॉ. अभिषेक मनु सिंघवी प्रतिवाद करतील.

15:15 March 15

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे न्यायालयात हजर

मुंबई - शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी युवा सेना नेते साईनाथ दुर्गे यांना बोरिवली न्यायालयात हजर केले.

15:01 March 15

विश्वासदर्शक ठराव घेणे हे राज्यपालांचे कर्तव्य या प्रकरणात त्यांनी तेच केले - शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली - राज्यपालांच्या लक्षात जेव्हा येते की विद्यमान सरकारने किंवा नेत्याने विश्वास गमावला आहे. त्यावेळी राज्यपालांचे नुसते कामच नाही तर हे आद्य कर्तव्य आहे की विश्वासदर्शक ठरवाला सामोरे जाण्यास सांगणे. या प्रकरणात राज्यपालांनी हेच केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही निर्विवाद आहे.

14:55 March 15

आधीच्या खटल्यांचे दाखले देऊन राज्यपालांनी योग्य निर्णय घेतल्याचा शिंदे गटाचा युक्तीवाद

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात घटनापीठापुढे राज्यातील ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षाची सुनावणी जेवणाच्या ब्रेकनंतर सुरू झाली आहे. शिंदे गटाचे वकील त्यांचा युक्तीवाद करत आहेत. त्यांनी राज्यपालांच्या अधिकारांच्या संदर्भातील परिस्थितीजन्य अधिकार तसेच कर्तव्यांसंदर्भात यापूर्वीच्या संबंधित निकालाचे दाखले दिले. तसेच याचसंदर्भात अधिक दाखले देणे सुरू आहे.

14:42 March 15

संप आंदोलनासाठी सलग दुसऱ्या दिवशी शासकीय कर्मचारी रस्त्यावर

बीड - राज्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी थाळीनाद आंदोलन करत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

14:12 March 15

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

मुंबई - बहूचर्चित दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांची सत्र न्यायालयाने 14 दिवसांनी कोठडी वाढवली आहे. आमदार अनिल परब यांच्यासोबत सदानंद कदम यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने आरोप केले आहेत.

14:02 March 15

शिवसेना चिन्हाच्या मुद्यावर निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात उत्तर दाखल

नवी दिल्ली - शिवसेना चिन्ह मुद्यावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात उत्तर दाखल केले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह देण्याचे करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आणि म्हटले की हा एक तर्कसंगत आदेश आहे. उद्धव गटाने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश निर्णय देताना केला आहे, असेही उत्तरात आयोगाने स्पष्ट केले आहे.

13:57 March 15

मुंबईत 23 वर्षाच्या मुलीने आईची हत्या करून तिचे तुकडे घर-परिसरात ठेवल्याने खळबळ

मुंबई - तरुण 23 वर्षाच्या मुलीने आईची हत्या करून तिचे तुकडे घर आणि परिसरात ठेवल्याने खळबळ. पोलिसांना संशय आल्याने घराची झडती घेतली. त्यावेळी शरीराचे अवयव सापडले. आरोपी मुलीची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

12:33 March 15

राज्यपालांनी निर्णय घेताना अनेक गोष्टींच्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसते - सरन्यायाधीश

नवी दिल्ली - सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावणीच्यावेळी राज्यपालांनी काही गोष्टींच्याकडे लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, राज्यपालांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या नाहीत. एक म्हणजे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्याबरोबर आहेत. किंवा दोन्ही पक्षांमध्ये कोणताही अंतर्गत मतभेद नाहीत, ते आजही नाहीत. तसेच आकड्यांकडे पाहता, काँग्रेसकडे 44 तर राष्ट्रवादीचे 53 सदस्य होते. हा एकूण आकडा 97 चा आहे. आजही हे 97 आमदार एकसंघ आहेत. सरन्यायाधीशांनी असेही सांगितले की, राज्यपालांनी दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी करणार आहे असा एकही संकेत नाही. तीन पक्षांच्या युतीमध्ये आहे. तसेच तिघांपैकी एका पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. मात्र इतर दोघे युतीत ठाम आहेत. ते कोणत्याही प्रकारे त्यांच्या भूमिकेपासून बाजूला झालेले नाहीत, ही बाब राज्यपालांनी लक्षातच घेतली नाही असे दिसते.

12:19 March 15

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर 3 वर्षे सुखाने संसार केला, मग रातोरात असे काय घडले - सरन्यायाधीश

नवी दिल्ली - मेहता यांनी पक्षफुटीसंदर्भातील युक्तीवाद करताना त्यांना मध्येच तोडून सरन्यायाधीश म्हणाले की, पण त्यांनी तीन वर्षे याच आमदारांनी कोणतीही कटकट न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर राज्यकारभार केला. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी तीन वर्षे एका अर्थाने सुखाने संसार केला. मग रातोरात असे काय घडले की तीन वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काही आमदारांना अडचणीचे वाटू लागले, असा थेट सवाल सरन्यायाधीशांनी केला.

12:10 March 15

...फिर उसने वो भी सुना जो मैंने कहा ही नहीं, महाराष्ट्र सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टात मेहता यांनी ऐकवला शेर

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचे वकील सी जे मेहता यांचा युक्तीवाद सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी अनेक महत्वपूर्ण टिप्पणी तसेच निरीक्षणे नोंदवली. यावेळी अनेकदा त्यांनी मेहता यांनी मध्येच तोडून राज्यपालांचे अधिकार तसेच झालेले राजकारण याबाबत सरन्यायाधीशांनी त्यांची मते मांडली. यावेळी मेहता यांनी हलके झालेल्या वातावरणात मेहता यांनी एक शेर सुवावला, ते म्हणाले की, दूरियाँ जब बढ़ी तो गलतफहमियां भी बढ़ गयी, फिर उसने वो भी सुना जो मैंने कहा ही नहीं ! वास्तविक राज्यपालांच्या बाबतीत असे काही झाले असावे असे नाही असे मत मेहता यांनी मांडले.

12:04 March 15

राज्यपालांनी अधिकारांचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे - सरन्यायाधीश

नवी दिल्ली - राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर केला आहे की नाही हेही पाहावे लागेल. त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी मांडले.

11:59 March 15

लोकशाही धोक्यात आणणाऱ्या अनेक गोष्टी होत असल्याचे दिसत आहे - सरन्यायाधीश

नवी दिल्ली - लोकशाही धोक्यात आणणाऱ्या अनेक गोष्टी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याबद्दल घटनापीठाला अत्यंत चिंता वाटत आहे, अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली.

11:52 March 15

काही आमदारांचे पत्र राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी पुरेसे आहे काय - सरन्यायाधीश

नवी दिल्ली - आमचे इतर दोन सहकाऱ्यांशी म्हणजेच राष्ट्रवादी किंवा काँग्रेसबरोबर जमणार नाही त्यामुळे आम्ही वेगळे झालो आहोत. एवढे कारण राज्यपालांच्यासाठी विश्वास दर्शक ठराव घेण्यासाठी पुरेसे आहे का, सरन्यायाधीशांचा सवाल.

11:47 March 15

नुक्कड फेम ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही मालिका नुक्कड फेम ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. त्यांचा भाऊ गणेश खाखर यांनी ही माहिती दिली आहे.

11:13 March 15

लक्षवेधी असतानाही मंत्री विधानसभेत गैरहजर, अजित पवार संतापले!

लक्षवेधी असणाऱ्या मंत्र्यांनी सभागृहात लवकर येणे आवश्यक आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मंत्र्यांना समज देऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

11:02 March 15

पुण्यात सात वर्षापासून पाकिस्तानी तरुणाचा मुक्काम, आधारबरोबर पासपोर्टदेखील बनविले...

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील भवानी पेठ येथे गेल्या सात वर्षांपासून एक पाकिस्तानी तरुण वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्टदेखील बनविले असल्याचे उघड झाले आहे.

10:47 March 15

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आल्याने त्यांना खूश करण्यासाठी सरकारने कापूस आयात केला का? रोहित पवार

शेतकऱ्यांसाठी सरकारकडे वेळ नाही. हजारोंच्या संख्येने शेतकरी नाशिक वरून निघाले आहेत पण त्यांच्याशी चर्चा करायला सरकारकडे वेळ नाही. सभागृहात लक्षवेधी प्रश्नावर उत्तर द्यायला मंत्री सभागृहात हजर नाहीत. आज कापूस शेतकऱ्यांचा २१ कोटींचा कापूस घरात पडून आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले. त्यांना खुश करण्यासाठी कापूस आयात केला गेला का? हा सुद्धा प्रश्न असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

09:45 March 15

न्यायालयातील न्याय अजून मेला नाही-संजय राऊत

ठाकरे परिवाराला टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. खोकेवाल्यांना सोडून आमच्याकडे हिशोब मागितला जात आहे. न्यायालयातील न्याय अजून मेला नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सरकारकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार राऊत हे दिल्लीत माध्यमांशी बोलत आहेत.

09:25 March 15

ठाण्यातील एका रुग्णालयात लागली आग

ठाण्यातील एका रुग्णालयात आग लागली आणि अर्ध्या तासात ती विझवण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. शिल येथील १७ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीत कोणीही जखमी झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

08:31 March 15

सुरक्षा दलाकडून नाका तपासणीदरम्यान दहशतवाद्याला अटक

बारामुल्ला पोलिस, आर्मी 29 आरआर आणि 2 बीएन एसएसबीच्या संयुक्त दलाने सिंगपोरा पट्टण येथे नाका तपासणीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. अली मोहम्मद भट (TRF) या एलईटीचा दहशतवादी सुरक्षा दलाने पकडला आहे. त्याच्या वैयक्तिक झडतीदरम्यान, AK-47 चे 71 जिवंत राउंड सापडले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.

07:49 March 15

कंत्राटी पद्धतीने सरकारी जागा भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय, संपकरी कर्मचाऱ्यांवर होऊ शकते कारवाई

ऐन संपात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकऱ्यांवरील जागा भरण्यासाठी सातहून अधिक एजन्सींची मदत घेणार आहे. कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा निर्णय घेऊन सरकारने एकप्रकारे संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

07:32 March 15

महाराष्ट्रात एच३एन२ चे दोन मृत्यू? वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यानंतर एच३एन२ चे संकट घोंगावू लागले आहे. औरंगाबाद, पुणे, अहमदनगरमध्ये या रुग्णांची संख्या वाढत आहे. अहमदनगरसह नागपूरमध्ये एच३एन२ मुळे दोन जणांचा मृत्यू झाला.

07:15 March 15

एका महिला नेत्याचा दुचाकीवरून पाठलाग, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

एका महिला नेत्याचा दुचाकीवरून दोन जणांनी पाठलाग केला होता. दादर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोघांना ताब्यात घेतले आहे.

07:14 March 15

धायरीमधील आगीत कारखान्याचे मोठे नुकसान

सिंहगड रोडच्या धायरी भागात असलेल्या कारखान्यात संध्याकाळी ७ च्या सुमारास लागलेल्या मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्फोटात सहा कारखाने जळाले आहेत.

06:59 March 15

अमेरिकेच्या ड्रोनला रशियन जेटची धडक, दोन्ही देशात तणावाची स्थिती

समुद्रावर अमेरिकेच्या ड्रोनला रशियन जेटची धडक झाली. त्यामुळे दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

06:59 March 15

आठ वर्षांचा मुलगा ६० फूट बोअरवेलमध्ये पडला, वाचविण्याचे प्रयत्न सुरू

मध्य प्रदेशमध्ये आठ वर्षांचा मुलगा ६० फूट बोअरवेलमध्ये पडला आहे. त्याला वाचविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

06:59 March 15

कारमधून चलनी नोटा फेकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, युट्युबरसह एकाला अटक

गुरुग्राममध्ये युट्युबरने त्याच्या चालत्या कारमधून चलनी नोटा फेकत असल्याचा व्हिडिओ केला आहे. याप्रकरणी जोरावर सिंग कलसी आणि गुरप्रीत सिंग या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे एसीपी विकास कौशिक यांनी सांगितले.

06:42 March 15

दारु-मटणाच्या पार्टीसाठी अडीच हजाराची लाच घेताना डायटचा प्राचार्य 'एसीबी'च्या जाळ्यात

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. चार महिन्याची पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून दारु व मटणाच्या पार्टीसाठी अडीच हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

06:37 March 15

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

तोशाखाना संदर्भाशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयात हजर न राहिल्याने आणि महिला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी पीटीआयचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर दोन अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. पोलीस त्यांनी कधीही अटक करू शकतात.

06:35 March 15

कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सरकार सहानुभूतीपूर्ण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सरकार सहानुभूतीपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

06:32 March 15

केवळ प्रेक्षक आणि चित्रपट उद्योगाच्या प्रेमामुळेच ऑस्कर मिळविणे शक्य-ज्युनिअर एनटीआर

हैदराबाद: एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना हा माझ्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण होता. मला आरआरआचा खूप अभिमान आहे. सिनेमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी प्रत्येक भारतीयाचे आभार मानतो. केवळ प्रेक्षक आणि चित्रपट उद्योगाच्या प्रेमामुळेच ऑस्कर मिळविणे शक्य झाल्याचे प्रतिक्रिया ज्युनियर एनटीआरने हैदराबादमध्ये विमानतळावर आल्यानंतर दिली आहे.

06:15 March 15

Maharashtra Breaking News: 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत..चौकशीसाठी मुलगी ताब्यात

मुंबई : लालबाग परिसरात एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला. मृत महिलेच्या 22 वर्षीय मुलीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असल्याचे डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

Last Updated :Mar 15, 2023, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.