मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरण; सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची पुण्यात बदली

मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरण; सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची पुण्यात बदली
Jalna SP Tushar Doshi : जालना जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात आली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी ते सक्तीच्या रजेवर होते.
मुंबई Jalna SP Tushar Doshi : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. गृह विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तेव्हाचे जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. आता तुषार दोषी यांची बदली करण्यात आली आहे. तुषार दोषी यांची पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली. सोमवारी (२० नोव्हेंबर) त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.
काय आहे प्रकरण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती ढासळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तेव्हा मनोज जरांगेचे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. याचं रुपांतर पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये झालं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू झाली. यानंतर सरकारनं जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्यभरात पडसाद उमटले : जालन्यात घडलेल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळाले. विशेषत: मराठवाड्यात आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी जाळपोळ केली. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या. बीड जिल्ह्यात आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आणि ऑफिसला आग लावली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मनोज जरांगे अजूनही आपल्या मागणीवर ठाम असून यासाठी ते आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
हेही वाचा :
