ETV Bharat / state

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, शिंदे गटाचं आव्हान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 4:57 PM IST

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या नावाखाली जनतेसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आपलीच माणसं समोर ठेवून जनतेत जाण्याचे नाटक करण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात उतरा, असं थेट आव्हान शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

किरण पावसकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनी काल 'जनता न्यायालय' अशी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या जनता न्यायालयात त्यांच्याच लोकांचा सहभाग असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केलीय. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय मान्य नसल्याचं, सांगत जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचा कांगावा सुरू आहे, असा टोला देखील त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.

जनतेसमोर उभं राहण्याची हिंमत दाखवा : जनतेच्याच न्यायालयात जायचं असेल, तर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर उभे राहण्याची हिंमत ठाकरेंनी दाखवावी. 2019 च्या निवडणुकीत तुम्ही एकीकडं बाळासाहेबांचा फोटो लावला, तर दुसरीकडं भाजपानं तुम्हाला भरभरून मतं दिली. मात्र, त्यानंतर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत घरोबा केला. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मतांचा अपमान केलाय. आता पुन्हा कशाला जनतेच्या न्यायालयात जाण्याची भाषा करत आहात. जनता आता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं किरण पावसकर म्हणाले.

पत्राचाळीसाठी कुठले भांडवलदार आणले : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे उमेदवार गुजरातमधील भांडवलदार ठरवतील, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात पावसकर म्हणाले, पत्राचाळीच्या बिलामध्ये तुम्ही कुठल्या भांडवलदारांना भेटला, ती डील कुठल्या भांडवलदारांना घेऊन केली, याची तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं भांडवलदारांशी तुमचा संबंध आहे. गुजरातचे कुठले भांडवलदार आहेत, हे तुम्हाला चांगले माहीत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे जनतेचेच असतील, असंही पावसकर यांनी म्हटंलय.

भाव वाढवून घेण्याचा प्रयत्न : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला तसंच प्रणिती यांना भाजपाकडून ऑफर होती, असं वक्तव्य केलं. त्यावर पावसकर म्हणाले की, राजकारणात ज्या नेत्यांना आता भाव उरलेला नाही, ते नेते स्वतःचा भाव वाढवून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या वल्गना करत आहेत. त्याकडं लक्ष देण्याची गरज नाही.

हेही वाचा -

  1. पत्रकार परिषदेच्या नावाने विधानसभा अध्यक्षांचा अवमान कराल, तर तुमच्यावर हक्कभंग येणार-राम कदम
  2. शिंदे गटाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; 'हे' दिले महत्त्वाचे निर्देश
  3. शरद पवार अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार; मात्र ठेवली 'ही' अट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.