ETV Bharat / state

Hanging Garden : ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी 389 झाडांची कत्तल, रहिवाशांनी विरोध करताच पालकमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 3:42 PM IST

Hanging Garden
Hanging Garden

Hanging Garden : मुंबईच्या मलबार हिल परिसरात 136 वर्षे जुन्या ब्रिटिश कालीन जलाशयाची क्षमता वाढविण्यासाठी त्या जलाशयाची पुनर्बांधणीसाठी करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आलाय. मात्र यासाठी तब्बल 389 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या कत्तलीला परिसरातील नागरिकांनी विरोध केलाय.

मुंबई Hanging Garden : मुंबईतील मलबार हिल येथील 136 वर्षांच्या ब्रिटिश कालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी हँगिंग गार्डन येथील तब्बल 389 झाडं कापावी लागणार आहेत. मात्र या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी झाडं हटवण्यास विरोध केलाय. रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. मलबार हिल येथील हँगिंग गार्डनला दररोज अनेक मुंबईकर भेट देतात, याठिकाणी आपल्या लहान मुलांसह वेळ घालवतात. अशा या निसर्गरम्य आणि नैसर्गिक टेकडीवरील तब्बल 389 झाडांची कत्तल करण्यात येणार असल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत.


जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी काम : मलबार हिल परिसरात पालिकेचं 136 वर्ष जुनं जलाशय आहे. या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सध्या या जलाशयाची 147 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. ही क्षमता 191 दशलक्ष लिटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे. या जलाशयातून दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयावर मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डन आहे. मात्र, जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी काम करताना या हँगिंग गार्डन मधील तब्बल 389 झाडं कापावी लागणार आहेत. याला स्थानिकांनी विरोध केल्यानं या जलाशयाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक : झाडं कापण्यासाठी संबंधित विभागानं वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यामुळं या विषयाला तोंड फुटले. मात्र मलबार हिलसारख्या उच्चभ्रू विभागातील नागरिकांनी या प्रस्तावाला विरोध केलाय. त्यामुळं या विषयावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मागील आठवड्यात पालिका मुख्यालयात नागरिकांची व पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा एक बैठक घेवून तोडगा काढण्याचं प्रयत्न करण्यात आला. या बैठकीला दक्षिण मुंबईतील सुमारे शंभर नागरिक उपस्थित होते. या बैठकीसाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अतिरिक्त आयुक्त पी. वेळारूस, अभिनेत्री जुही चावला, मुंबई महानगरपालिकेचे इतर अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.


कमिटी स्थापन करण्याचे निर्देश : बैठकीमध्ये नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर मंत्री लोढा यांनी प्रशासनासह काम करण्यासाठी नागरिकांची एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनात पारदर्शकता असावी या दृष्टीने नागरिकांचा सहभाग अतिशय आवश्यक असल्यानं या कमिटीची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरेल. तसेच, या जलाशयासाठी दुसरी जागा शोधण्याबाबतही पालिका प्रयत्न करत आहे. काही महत्त्वाच्या जागा पालिकेच्या नजरेत असून, त्याबाबत आढावा घेतला जात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. Expensive Apartment Sold Mumbai : अबब! मुंबईत खरेदी केले 369 कोटींचे घर; नेमकी कोण आहे 'ही' व्यक्ती
  2. Shirdi Sri Sai Palkhi Garden : शिर्डी नगरपंचायतीने भाविकांसाठी उभारले तब्बल अडीच कोटींचे गार्डन
  3. Central Vista : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आहे तरी काय? काय आहे त्याची पुनर्विकास योजना? जाणून घ्या सर्व काही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.