ETV Bharat / state

Case Against MLA Ravindra Waikar Wife : अलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 8:18 PM IST

Case Against MLA Ravindra Waikar Wife
शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर

Case Against MLA Ravindra Waikar Wife : शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्की हे प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊ या.

किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया

मुंबई Case Against MLA Ravindra Waikar Wife : बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतच्या कराराचे उल्लंघन करून जोगेश्वरी येथे आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेनं आमदार रवींद्र वायकर (शिवसेना ठाकरे गट) आणि त्यांच्या पत्नीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. 14 सप्टेंबरला आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापालिकेचे अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आलाय.

क्रीडा सुविधेसाठी परवानगी : या प्रकरणात रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यवसाय भागीदार आसू नेहलवाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. तक्रारीनुसार, वायकर यांनी जोगेश्वरी भूखंडावर क्रीडा सुविधा चालवण्याची परवानगी मिळवली होती. त्याबाबत महापालिकेशी करार केला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही परवानगी देण्यात आली होती.


500 कोटींचा घोटाळा : रवींद्र वायकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केलं. आरक्षित भूखंडावर हा क्लब आणि आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केलाय. हा 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमैया यांनी केलाय. सोमैया यांच्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली. वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. रवींद्र वायकर हे आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले होते. आता त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.


पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीचं बांधकाम : किरीट सोमैया यांनी सांगितलंय की, उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत मी 11 मार्च 2023 ला आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी येथे दोन लाख चौरस फुटांचे मैदान भेट दिले. याच मैदानावर पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय. आता रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. कोणालाही अटक करण्यात आली नाही. आर्थिक गुन्हे शाखा आमदार आणि इतर आरोपींना चौकशीसाठी बोलावू शकते, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय.


कोविड बॉडी बॅग घोटाळा : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यांची देखील दोन वेळा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केलीय. आता रवींद्र वायकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेच्या ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांवर आरोप आणि खटले दाखल होत आहेत, त्यामुळे ठाकरे गट अडचणीत सापडलाय. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा :

  1. रवींद्र वायकरांची मुख्यमंत्री व शिवसेना आमदारांचे समन्वयक म्हणून नियुक्ती
  2. Kirit Somaiya on Ravindra Waikar: पंचतारांकित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा- किरीट सोमैया
  3. Land Scam Case : 500 कोटींचा कथित भूखंड घोटाळा प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याची कसून चौकशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.