ETV Bharat / state

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे राज्यातील अनेक नेत्यांशी कथित संबंध? राजकीय आरोपांनी प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 4:47 PM IST

Updated : Dec 18, 2023, 6:17 PM IST

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे राज्यातील अनेक नेत्यांशी कथित संबंध असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. या आरोपांमुळे अनेक नेते वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत.

Dawood Ibrahim
Dawood Ibrahim

मुंबई Dawood Ibrahim : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या सोमवारी सकाळी सोशल मीडियावर झळकल्या. दाऊदवर कराचीत उपचार सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी : दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याच्या विरोधात भारतानं संयुक्त राष्ट्रसंघात अनेक पुरावे सादर केले. मात्र अद्याप त्याला बेड्या ठोकण्यात सरकारला यश आलेलं नाही. आता दाऊदवर कराचीत विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याच्याशी संबंध असलेले कथित राजकीय नेते, सिनेसृष्टीतील स्टार आणि दाऊदची मुंबईतील संपत्ती याची चर्चा होऊ लागली आहे.

अनेक नेत्यांसोबत संबंध असल्याच्या चर्चा : दाऊद इब्राहिमचे देशातील अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचंही केंद्रीय तपास यंत्रणांनी म्हटलं आहे. तसंच या नेत्यांचे दाऊदसोबत आर्थिक व्यवहार असल्याचा संशय सुद्धा तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मविआ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे आरोप केले होते. यानंतर मलिकांना अटकही झाली होती. या दरम्यान हाजी अली आणि माहिम दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहेल खंडवानी यांचीही एनआयएद्वारे चौकशी झाली होती.

शरद पवार यांच्यावर मदत केल्याचा आरोप : दाऊद इब्राहिमशी कथित संबंधामुळे राज्यातील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यातील पहिलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंं. शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमला मुंबईतून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप अनेकदा केला गेला आहे. शरद पवारांनी साखळी बॉम्बस्फोटातील तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच त्यांनी दाऊदसोबत हेलिकॉप्टरनं प्रवासही केला होता, असा आरोपही शरद पवारांवर केला जातो. मात्र ते आजपर्यंत कुणीच सिद्ध करु शकलेलं नाही.

नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध : माजी मंत्री नवाब मलिकांवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत. नवाब मलिकांनी कुर्ल्यातील जागेच्या खरेदीसाठी दाऊदसोबत आर्थिक व्यवहार केले असल्याचा आरोप करत ईडीनं त्यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसेंवरही दाऊदसोबत फोनवरुन संभाषण केल्याचा आरोप झाला आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्चीची संपत्ती विकत घेतल्याचा आरोप झाला आहे.

नितेश राणेंचे आरोप : हिवाळी अधिवेशनाच्या गेल्या आठवड्यात भाजपा आमदार नितेश राणेंनी नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचे फोटो दाखवले. सलीम कुत्ता हा दाऊदचा साथीदार आहे, असं म्हटलं जातं. बडगुजर यांचे सलीम कुत्तासह दाऊदशीही संबंध असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. आता बडगुजर यांची एसआयटी मार्फत चौकशी केली जात आहे. ही चौकशी नेमकी कोणत्या प्रकरणात केली जात आहे, याबाबत वेगवेगळे खुलासे होत आहेत.

दाऊदचे राज्यातील अनेक नेत्यांशी संबंध असल्याच्या चर्चा माध्यमात होत आहेत. मात्र आतापर्यंत नवाब मलिक वगळता कोणत्याही नेत्यावर कारवाई का झाली नाही? जे सरकारच्या विरोधात होते (प्रफुल्ल पटेल), तेव्हा त्यांची चौकशी सुरु होती. मात्र आता ते सरकारमध्ये गेल्यामुळं त्यांची चौकशी बंद झाली. दाऊद आठ दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याच्यावर विषप्रयोग झाला नसावा, असं मला गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्यांनं फोनवर सांगितलंय. असा प्रकार जरी घडला तरी पाकिस्तान ते जगजाहीर करणार नाही. कारण दाऊद हा पाकिस्तानसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. - ज्येष्ठ क्राईम पत्रकार प्रभाकर पवार

एकूणच पाहता अनेक राजकारणी आणि कलाकारांचे संबंध दाऊदशी कथितरित्या जोडले गेले आहेत. मात्र याबाबत कोणतीही ठोस सिद्धता न्यायालयीन पातळीवर झाल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे विविध पातळीवर हे फक्त आरोप होताना दिसतात. मात्र यामध्ये कायदेशीर तथ्य किती, हे तपास यंत्रणाच शोधून काढू शकतात.

हे वाचलंत का :

  1. भारताच्या मोस्ट वाँटेड दाऊदवर विषप्रयोग? सोशल मिडियात दावा, पाकिस्तानात इंटरनेट बंद
  2. सलीम कुत्ताशी संबंधावरून सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी
  3. ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
Last Updated : Dec 18, 2023, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.