ETV Bharat / state

BJP On Dalit Votes : येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपची मोर्चेबांधणी; आता दलित मतांवर नजर?

author img

By

Published : May 18, 2023, 9:25 PM IST

Updated : May 19, 2023, 12:27 PM IST

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी आपल्या एका दलित कार्यकर्त्याच्या घरी पाहुणचार घेतला. त्यांच्या प्रवक्त्यांनी तसे आदल्या दिवशी जाहीरच केले होते. मात्र प्रत्यक्षात कोणीही पुन्हा त्याचा उच्चार केला नाही. असे असले तरी राज्यातील दलित मतांची मोर्चे बांधणी या निमित्ताने सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात नेमकी काय आहे दलित मतांची स्थिती जाणून घेऊया..

BJP On Dalit Votes
BJP On Dalit Votes

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत आल्यानंतर त्यांनी घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर या दलित वस्तीत एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनासाठी हजेरी लावली. शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दलित वस्तीत जाऊन जेवण केले हा संदेश केवळ द्यायचा होता. वास्तविक महाराष्ट्रात अस्पृश्य निवारणाची चळवळ बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष सुद्धा आता सर्वसामान्यांचा पक्ष आहे तो तळागाळात पोहोचलेला पक्ष आहे एवढाच माफक संदेश पोहोचवणं आणि दलित मतदारांवर आपली पकड निर्माण करणे हा या भेटी मागचा उद्देश होता एवढे नक्की.

काय आहे राज्यातील दलित मतांचं समीकरण? : महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी सुमारे 60 ते 65 मतदारसंघांवर दलित मतदारांचा मोठा प्रभाव आहे. अन्य मतदारसंघांमध्येही कमी अधिक प्रमाणात दलित मतदारांची संख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण हे पस्तीस टक्के दलित मतदारांवर अवलंबून असते. त्यामुळे राज्यावर जर तुम्हाला सत्ता मिळवायची असेल, तर दलित मतदारांना आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे सर्वच पक्ष जाणून आहेत त्यामुळे सर्व पक्ष दलित मतदारांवर डोळा ठेवून आहेत.

दलितांकरिता लोकसभेत राखीव जागा
दलितांकरिता लोकसभेत राखीव जागा

लोकसभेचे किती मतदारसंघ राखीव? : राज्यातील अनुसूचित जाती, जमातीसाठी लोकसभेचे नऊ मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 मतदारसंघांपैकी नऊ मतदारसंघ हे अनुसूचित जाती, जमातींसाठी राखीव असणार आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात अनुसूचित जमातीसाठी दोन मतदारसंघ, विदर्भात अनुसूचित जातींसाठी दोन आणि जमातींसाठी एक मतदार संघ, मराठवाड्यात अनुसूचित जातीसाठी एक मतदारसंघ, पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी दोन मतदारसंघ आणि मुंबईत अनुसूचित जमातीसाठी एक मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे अनुसूचित जातीच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सोलापूर, लातूर, शिर्डी, रामटेक, अमरावती या पाच लोकसभा मतदारसंघांचा तर, नंदुरबार गडचिरोली चिमूर आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातीच्या मतदारसंघांचा समावेश होतो.


दलितांकरिता विधानसभेसाठी राखीव जागा
दलितांकरिता विधानसभेसाठी राखीव जागा

विधानसभेसाठी किती मतदारसंघ राखीव? : राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या मतदारांसाठी 288 विधानसभेच्या मतदारसंघांपैकी 54 मतदारसंघ हे राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकोणतीस तर, अनुसूचित जमातीसाठी 25 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातीसाठी चार, नाशिक जिल्ह्यात चार, गडचिरोली जिल्ह्यात तीन आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मतदार संघ राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जातीसाठी दहा जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये एक मतदारसंघ राखीव आहे. यामध्ये नागपूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मात्र दोन मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत.

राखीव मतदार संघ कोणाकडे? : राज्यातील या राखीव मतदार संघावर कोण वर्चस्व गाजवणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागलेले असते. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा रिपब्लिकन पक्ष या तीन पक्षांची मक्तेदारी या मतदारसंघांवर होती. मात्र गेल्या दोन निवडणुकांपासून ही मक्तेदारी बदलत असून या मतदारसंघांवर आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने ही आपला दावा सांगितला आहे. शिवसेनेने दावा सांगितलेल्या मतदार संघांमध्ये आता भाजपाला आपला झेंडा रोवायचा आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष आपला चेहरा बदलत असल्याचे त्यांच्या विविध उपक्रम आणि प्रयत्नांवरून दिसते आहे.

  • हेही वाचा -
  1. Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांच्या अडचणी वाढणार, शिवसेना आणणार अविश्वासाचा ठराव?
  2. Eknath Shinde On JP Nadda : जे. पी म्हणजे 'जबान के पक्के'; मुख्यमंत्र्यांनी नड्डांचे केले कौतुक
  3. Devendra Fadnavis On Bullock Cart Races : बैलगाडी शर्यतीचा निकाल म्हणजे शेतकऱ्यांचा विजय - फडणवीस
Last Updated :May 19, 2023, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.