ETV Bharat / state

लाव रे तो व्हिडिओ : भाजप-मनसे युतीच्या नादी, पण मोदी-शहांनी राज ठाकरेंना माफ केलंय का?

author img

By

Published : Aug 7, 2021, 10:34 PM IST

Updated : Aug 8, 2021, 12:40 AM IST

चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चां रंगू लागल्या आहेत. त्यात बाळा नांदगावकरांनीही युतीकडे सकारात्मक पाहणार असल्याचे म्हटले आहे. पण, 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपची पोलखोल केली. त्यामुळे आता युती करण्यासाठी मोदी, अमित शहा राज ठाकरेंना माफ केलंय का? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांनी उपस्थित केला आहे.

modi
modi

मुंबई - विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या तोंडातून राज्यातील सत्तेचा घास शिवसेनेने हिरावून घेतला. या धक्क्यातून भाजप अजूनही सावरली नसल्याने शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी सध्या मनसेचा आधार घेण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहेत. राज्यातल्या आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जोरदार तयारी करत असले तरी अनेक मुद्यांवर मनसे आणि भाजप यांची थेट युती होण्याची चिन्हे धुसर असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्राचाराची राळ उठवून भाजपमुक्त भारताची घोषणा केली होती. आता या घोषणेबाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राज ठाकरे यांना माफ केलंय का? असाही प्रश्न राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय विश्लेषक

भाजप आणि मनसेला सोबतीची गरज

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेसारखा बलाढ्य साथीदार भाजपने गमावल्यानंतर भाजप नव्या राजकीय साथीदाराच्या शोधात आहे. शिवसेनेला जोरदार धक्का द्यायचा असेल तर मुंबई महानगरपालिकेमधील शिवसेनेच्या सत्तेला धक्का द्यावा लागेल, हे भारतीय जनता पक्षाला चांगलंच ठाऊक झालं आहे. गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती राज्यात सत्तेत असूनही दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणुका लढले होते. यात भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. मात्र शिवसेनेने २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला राज्याच्या सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्याचा वचपा काढण्यासाठी महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मुंबईतील वर्चस्वाचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष मनसेशी युती करण्याच्या सध्या मनस्थितीत आहे. सध्या मनसेचा केवळ एकच नगरसेवक मुंबईत आहे. मात्र, मुंबईतल्या काही मराठी बहुल भागात अजूनही मनसेची वोटबँक आहे. हीच वोटबँक मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे.

बाळा नांदगावकर

मनसेला भाजपच्या साथीची गरज?

गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मनसेचे २००९ विधानसभेत १३ आमदार निवडून आले होते. तर २०१२ च्या महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले होते. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये केवळ 7 नगरसेवक मनसेला निवडून आणता आले. त्यातलेही 6 नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्यामुळे मनसेला मोठा धक्का पोहोचला होता. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सध्या मनसेची धडपड सुरु आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपची साथ मनसेला मिळाली तर मनसे पुन्हा एकदा पुनर्जीवीत होईल हे राज ठाकरे यांना देखील ठाऊक आहे. मात्र, थेट युती न करता एकमेकांना पोषक ठरेल अशी छुपी युती करण्याचा प्रयत्न मनसेकडून असेल, असं मतं राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केलं आहे.

कोणत्या मुद्यावर भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात?

मनसेला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. १२५ जागा लढवून केवळ एका जागेवर मनसेला आपला आमदार निवडून आणता आला. या अपयशातून बाहेर पाडण्यासाठी मनसेने आपला झेंडा बदलून थेट भगवा झेंडा हाती धरला. हिंदुत्वाच्या दिशेने पुढे जात शिवसेनेकडे मराठी अस्मितेसह असणारी हिंदू वोटबँकही आकर्षित करण्याचा प्रयत्न मनसेचा आहे. हिंदुत्व या केवळ एका मुद्द्यावर भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात.

परप्रांतीयांच्या मुद्यावर एकमत होणार?

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसे हा प्रादेशिक अस्मितेच पक्ष आहे. भाजपला राष्ट्रीय स्तरावर भूमिका घेणे भाग आहे. पण मराठी भूमिपुत्र आणि त्यांच्या हक्काबाबत संघर्ष करून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची राज्यभरात पाळंमुळं रुजवली आहेत. मराठी भूमिपुत्रांच्या मुद्यावर आजही मनसे कायम आहे. या मुद्यावर संघर्ष करत असताना अनेक वेळा परप्रातीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली आहे. भाजपची राज ठाकरे यांच्या पक्षासोबत युती होऊ शकते. मात्र, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय लोकांबाबत असलेली त्यांची विचारधारा बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे भाजपशी राज ठाकरे यांना युती करायची असेल तर आपली विचारधारा बदलावी लागेल, असा संदेश चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ठाकरे यांना दिलेला आहे. आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ असणारे नेते म्हणून राज ठाकरे यांची जनसामान्यात ओळख आहे. त्यामुळे आपल्या ओळखीला तडा जाईल अशी भूमिका राज ठाकरे राजकीय फायद्यासाठी घेतील का? हे देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न असल्याचे राजकीय विश्लेषक अकोलकर यांचे म्हणणे आहे.

चंद्रकांत पाटील

थेट युतीचा तोटा दोन्ही पक्षांना?

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही पक्षांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर या संभाव्य युतीचा फटका दोन्ही पक्षाला बसेल असं मतं राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन मोदींच्या विरोधात जहरी टीका केली होती. "लाव रे तो व्हिडिओ" म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा समाचार आपल्या प्रचार सभेतून घेतला होता. त्यामुळे राज ठाकरेबरोबर एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे गेल्यास जनता दोन्ही पक्षांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल. याचबरोबर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत असलेली भूमिका, तसेच उत्तर भारतीयांना केलेली मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण याबाबत नव्यानेच भारतीय जनता पक्षात सामील झालेले मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले कृपाशंकरसिंग यांना राज ठाकरेंची साथ आवडेल का? असा प्रश्नही विश्लेषकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष थेट युती न करता निवडणुकीमध्ये एकमेकांना पोषक ठरेल अशी भूमिका घेतील. या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मतं परिवर्तीत करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करू शकतील, असं मत राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केलं आहे.

बाळासाहेब थोरात

राज ठाकरे त्यांची भूमिका बदलणार नाहीत - थोरात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी (६ ऑगस्ट) भेट झाली. या भेटीनंतर पुन्हा एकदा भाजप आणि मनसे युती होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत घेतलेली भूमिका ते बदलणार नाहीत. त्या भूमिकेवर राज ठाकरे ठाम राहतील, असा विश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. राजकीय लाभ व्हावा म्हणून भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, राज ठाकरे आपली भूमिका सोडणार नाहीत, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकरे यांच्या "लाव रे तो विडिओ"ला भाजप नेते काय उत्तर देणार? असा सवालही थोरात यांनी उपस्तिथ केला आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

Last Updated :Aug 8, 2021, 12:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.