ETV Bharat / state

Lata Mangeshkar Award 2023 : यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 10:34 PM IST

Updated : Nov 11, 2023, 10:51 PM IST

State Govt lata Mangeshkar Award 2023
लता मंगेशकर पुरस्कार मानकरी

Lata Mangeshkar Award 2023 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Singer Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शनिवारी ही घोषणा केली आहे.

मुंबई Lata Mangeshkar Award 2023 : यावर्षीचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी पं. श्री. उल्हासजी कशाळकर यांचे नाव घोषित झाले असून, २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. श्री. शशिकांतजी (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

इतरही पुरस्कारांची घोषणा - गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. तसंच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचं समाधान आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे यासाठी तत्पर असल्याची ग्वाही, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.

सुहासिनी देशपांडे यांना पणशीकर पुरस्कार : नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर २०२३ साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला आहे. २०२३ च्या पुरस्कारासाठी मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिलं आहे, त्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२२ व २०२३ घोषणा : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२२ व २०२३ चीही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक या विभागासाठी २०२२ चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर २०२३ चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये २०२२ चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झाला आहे. २०२३ चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. संगीत प्रकारातील २०२२ चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला आहे. २०२३ चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे.

पुरस्कार २०२३ ची नावे : लोककला क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना जाहीर झाला आहे. २०२३ चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहीरी क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार जयंत अभंगा रणदिवे यांना तर, २०२३ चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील २०२२ चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला आहे. २०२३ साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी २०२२ चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, २०२३ चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला आहे. २०२३ चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे.

मुनगंटीवार यांनी मान्यवरांचे अभिनंदन केलं : वाद्य संगीत क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार पं. श्री. अनंत केमकर यांना मिळाला आहे. २०२३ साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी २०२२ साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे. २०२३ साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२२, बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, २०२३ चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये २०२२ साठी भिकल्या धाकल्या धिंडा तर, २०२३ साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे. तर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलं आहे.

पुरस्कारांच्या रक्कमेत मोठी वाढ : सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पंणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपये होती, ती यापुढे दहा लक्ष रुपये होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची जी एक लाखाची रक्कम होती ती रक्कम तीन लाखाची करण्यात येत आहे अशीही घोषणा, सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या क्षेत्रामधील व पुरस्कारांमधील वाढ : सध्या ५० वर्षे वयावरील पुरुष कलाकारांना व ४० वर्षावरील महीला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराअंतर्गत १२ विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. यापुढे पन्नास वर्षावरील पुरुष आणि महिला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यात येत असून, ही क्षेत्रे २४ करण्यात आलेली आहेत. वाढ करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने; प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार, लोकनृत्य, लावणी /संगीतबारी, भारुड/गवळण /विधिनाट्य, वाद्यनिर्मिती करणारे कलाकार, झाडीपट्टी/खडीगंमत /दंडार, दशावतार /नमन खेळे / वही गायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणाऱ्या व त्यांचे जतन - वहन - संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था, ध्वनी तंत्रज्ञ /संकलक, संगीत संयोजक, वाईस ओवर आर्टिस्ट / निवेदक अशा विविध बारा क्षेत्राची वाढ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कमही तीन लक्ष रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

युवा पुरस्कार : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी अशी अनेक संघटनांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व २३ क्षेत्रांमध्ये "युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार" घोषित करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा २५ ते ५० एवढी राहणार असून, या पुरस्कारांची रक्कम एक लक्ष एवढी असेल.

निवड प्रक्रिया : उपरोक्त सर्व प्रकारच्या पुरस्कारासाठी निवड समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. या निवड समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुंनगंटीवार हे असून त्यामध्ये मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विकास खारगे व इतर नामवंत अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्य सचिव संचालक, सांस्कृतिक कार्य हे आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या शिफारसी व सदस्यांनी सुचवलेल्या शिफारसी यामधून पुरस्कार्थींच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यात कलाकारांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

पुरस्कार व विजेता :

गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

1) सुरेशजी वाडकर (2023)

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

1) सुहासिनी देशपांडे (2022)

2) अशोक समेळ (2023)

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार

1) नयना आपटे (2022)

2) मकरंद कुंडले (2023)

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार

1) पं. श्री. उल्हास कशाळकर (2022)

2) पं. श्री. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये (2023)

राज्य सांस्कृतिक पुरस्कार

नाटक :

1) वंदना गुप्ते (2022)

2) ज्येती सुभाष (2023)

उपशास्त्रीय संगीत :

1) मोरेश्वर निस्ताने (2022)

2) ऋषिकेश बोडस (2023)

कंठ संगीत :

1) अपर्णा मयेकर (2022)

2) रघुनंदन पणशीकर (2023)

लोककला :

1) हिरालाल रामचंद्र सहारे (2022)

2) कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (2023)

शाहिरी :

1) जयंत अभंगा रणदिवे (2022)

2) राजू राऊत (2023)

नृत्य :

1) लता सुरेंद्र (2022)

2) सदानंद राणे (2023)

चित्रपट :

1) चेतन दळवी (2022)

2) निशिगंधा वाड (2023)

कीर्तन प्रबोधन :

1) प्राची गडकरी (2022)

2) अमृत महाराज जोशी (2023)

वाद्य संगीत :

1) अनंत केमकर (2022)

2) शशिकांत सुरेश भोसले (2023)

कलादान :

1) संगीता राजेंद्र टेकाडे (2022)

2) यशवंत रघुनाथ तेंडोलकर (2023)

तमाशा :

1) बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) (2022)

2) उमा खुडे (2023)

आदिवासी गिरीजन :

1) भिकल्या धाकल्या धिंडा (2022)

2) सुरेश नाना रणसिंग (2023)

हेही वाचा -

  1. PM Narendra Modi Uncut : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार', पाहा संपूर्ण भाषण
  2. PM Modi On Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी रविवारी मुंबईत
  3. Narendra Modi Received Lata Mangeshkar Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला लतादीदींच्या आठवणींना उजाळा, म्हणाले...
Last Updated :Nov 11, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.