ETV Bharat / state

महिला दिन विशेष : कोल्हापुरातल्या एकाच कुटुंबातील सहा मुली झाल्या पोलीस

author img

By

Published : Mar 8, 2021, 6:05 AM IST

Bhosle family police girls news
भोसले कुटुंब पोलीस मुली न्यूज

आज(सोमवार) जागतिक महिला दिन साजरा होत आहे. महिला दिनानिमित्त एका कुटुंबातील सहा कर्तबगार पोलीस मुलींची गोष्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.

कोल्हापूर - महिला दिनाच्या दिवशी आपल्याला अनेक महिलांच्या यशोगाथा तसेच त्यांच्या कष्टाच्या, कर्तृत्वाच्या बातम्या पाहायला मिळतात. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील एक असे कुटुंब आहे ज्यांच्या घरातील एक दोन नव्हे तर चक्क सहा मुली पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. एकाच घरातील सहा मुली पोलीस असणारे राज्यातील किंबहुना देशातील पहिलेच कुटुंब असावे. कोण आहेत या सहा महिला पोलीस आणि कशा पद्धतीने त्यांना पोलीस बनण्याची प्रेरणा मिळाली त्याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट...

कोल्हापुरातल्या भोसले कुटुंबातील सहा मुली पोलीस झाल्या आहेत

भोसले कुटुंबातील 'पोलीस लेकी' -

पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात असलेल्या खोतवाडीमध्ये सुरेश रंगराव भोसले, चंद्रकांत रंगराव भोसले आणि प्रकाश रंगराव भोसले हे तिघे भाऊ राहतात. सुरेश भोसले यांना 4 मुली आणि 2 मुले तर, चंद्रकांत भोसले यांना तीन मुली आहेत. प्रकाश भोसले गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, सुरेश भोसले आणि चंद्रकांत भोसले गावातच राहतात आणि शेती करतात. त्या दोघाही भावांच्या एका पाठोपाठ एक अशा सहा मुली पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्या कर्तव्य बजावत आहेत.

सहाजणी कायद्याचा रखवालदार -

सुरेश भोसले यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. त्यातील सारिका भोसले, सुवर्णा भोसले आणि सुजाता भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. त्यांचा लहान भाऊ सोमनाथ भोसले सुद्धा आता भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तर, चंद्रकांत भोसले यांना तीनही मुलीच आहेत. त्या तीनही मुली पोलीस खात्यात आपली सेवा बजावत आहेत. रुपाली, सोनाली, सर्वात लहान विमल भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. यामध्ये सर्वात अगोदर सुवर्णा भोसले आणि सोनाली भोसले एकाचवेळी 2008मध्ये पोलीस खात्यात निवड झाली होती.

दोन किलोमीटर चालत जात शाळेत -

या सहाही मुली पन्हाळा गडाच्या पायथ्याला असलेल्या खोतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांना प्राथमिक शिक्षण वाडीमध्ये मिळाले मात्र, माध्यमिक शिक्षणासाठी वाघवे गावात जावे लागे. त्यासाठी त्यांना दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतर पार करून शेताच्या बांधावरून शाळेला जावे लागे. पावसाळ्यात कधी-कधी गुडघाभर चिखलातून प्रवास करत या सहाही जणींनी आपले शिक्षण पूर्ण केले.

6 पैकी 5 आहेत विवाहित -

सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या सहापैकी पाच जणींची लग्नं झाली आहेत. सुजाता भोसले यांचे लग्न अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे लग्न होऊन सुद्धा सर्व बहिणी भोसले हेच आडनाव लावतात. यामध्ये सारिका भोसले यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोस्टिंग आहे. सुवर्णा भोसले कोल्हापुरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात, सुजाता भोसले अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रुपाली भोसले नाशिक शहर पोलीस, सोनाली भोसले राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर आणि विमल भोसले यांची कोल्हापूर वाहतूक शाखा येथे पोस्टिंग आहे.

नातींसाठी आजी-आजोबांची धडपड -

सोयीसुविधांपासून लांब असलेल्या आणि शे-सव्वाशे लोकसंख्येच्या वाडीमध्ये असून सुद्धा आजोबा रंगराव भोसले यांना आपल्या नाती शिकून मोठ्या होणारच असा विश्वास होता. त्यादृष्टीने त्यांनी पहिल्यापासून मुलींना 'काहीही करून शिका आणि स्वतःच्या पायावर उभे रहा', अशी शिकवण दिली. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना पायपीट करून जावे लागत होते. तरीही त्यांनी निर्धाराने शिक्षण बंद केले नाही.


पंचक्रोशीतील लोकं मार्गदर्शन घेण्यासाठी येतात -

एकाच घरातील सहा मुली जेव्हा पोलीस बनतात तेव्हा नक्कीच ही गोष्ट अभिमानास्पद आणि आश्चर्यकारक आहे. म्हणूनच गावासह पंचक्रोशीतील लोकं सुद्धा आता भोसले कुटुंबीयांना भेटून पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन घेतात. परिसरातील सर्वच मुलींना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मुली झाल्या म्हणून नाराज व्हायचे नाही -

आपल्याला मुली झाल्या म्हणून नाराज व्हायचे कारण नाही. मुलांपेक्षा मुलींना आपल्या आई-वडिलांची अधिक माया असते. त्यामुळे मुलींना पाहिजे तितके शिकू द्या. त्यांना ज्या क्षेत्रात जावे वाटते त्याठिकाणी त्यांना जाऊ द्या. त्यामध्ये त्या नक्की यश मिळवतील, असा विश्वास या सहाही जणींच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.