ETV Bharat / state

Sharad Pawar News: शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा; भाजपा की हसन मुश्रीफ, कोणावर साधणार निशाणा ?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2023, 7:40 AM IST

Sharad Pawar Rally In Kolhapur
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात सभा घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शरद पवार यांनी अगोदर येवला आणि त्यानंतर बीडमध्ये सभा घेतली आहे. आता शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. आज शरद पवार हे कोल्हापुरात सभा घेत आहेत.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोन सभा झाल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात शरद पवार यांची निर्धार सभा होत आहे. या सभेआधी कोल्हापुरातील दसरा चौकात 'बाप तो बापच . .' असा आशय लिहिलेलं बॅनर झळकलं आहे. यामुळे आजच्या सभेत शरद पवार नेमका कोणावर निशाणा साधतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांची पहिली कोल्हापुरात सभा

शरद पवारांचे कोल्हापूरशी आहेत ऋणानुबंध : शरद पवार यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध आहेत. शरद पवार यांचं आजोळही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यानं येथील कार्यकर्त्याला अगदी नावानिशी शरद पवार ओळखतात. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999 रोजी कोल्हापुरात झाली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि कोल्हापूर हे समीकरण अधिक घट्ट झालं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यानं स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन खासदार दिले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, माजी खासदार निवेदिता माने, लेमनराव निकम, व्ही. बी. पाटील, आर. के. पवार अशी तगडी फौज राष्ट्रवादीकडं होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आहे. याचे पडसाद जिल्ह्यात नक्की उमटणार आहेत.

Sharad Pawar Rally In Kolhapur
शहरात लागलेलं बॅनर

टार्गेट कोण भाजप की हसन मुश्रीफ? : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली आहे. ईडीचा ससेमिरा मागे नको, या भीतीमुळे अनेक दिग्गज नेते अजित पवार यांच्यासोबत म्हणजेच भाजपाच्या सरकारमध्ये सामील झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले मंत्री हसन मुश्रीफ हे देखील अजित पवार यांच्यासोबत गेल्यानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली आहे. ही ताकद एकटवून संघटन मजबूत करण्याचं आव्हान शरद पवार यांच्या समोर असणार आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन सभांमध्ये शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष करत टीकास्त्र सोडलं. जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या सभेत शरद पवार यांच्या निशाण्यावर भाजपा की सत्तेसाठी साथ सोडलेले मंत्री हसन मुश्रीफ राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा -

  1. EC Notice To Sharad Pawar : कोण आहे राष्ट्रवादीचा खरा बॉस ? तीन आठवड्यात उत्तर द्या; काका-पुतण्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
  2. Sharad Pawar Photo : काकांचा फोटो वापरू नका, पुतण्याची कार्यकर्त्यांना सूचना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.