ETV Bharat / state

नव्या वर्षाचं स्वागत जंगल सफारीनं करताय तर थांबा; 'या' ठिकाणी पर्यटकांना असणार बंदी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 11:48 AM IST

New year 2024 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेक जण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजनात गुंतले आहेत. जर तुम्ही सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जंगल सफारीचं नियोजन करत असाल तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे.

New year 2024
पर्यटकांना बंदी

अभयारण्य पर्यटकांसाठी असणार बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य 30 आणि 31 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी अभयारण्य परिसरात नियमांचं भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे राज्यातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना 1958 साली करण्यात आली. त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असं नाव देण्यात आलं होतं. या अभयारण्यात एकूण 35 प्रकारच्या वन्यप्राण्यांची व 235 प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात 1800 प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी 1500 पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत. तर 300 औषधी वनस्पती आहेत. निसर्ग संपन्नतेने नटलेल्या दाजीपूर राधानगरी अभयारण्यात नवीन वर्षाच्या स्वागताला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, या ठिकाणी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी तसेच नवीन वर्षाच्या पार्ट्या करण्याची संख्या अधिक आहे. यामुळे वनविभागानं 30 आणि 31 डिसेंबर रोजी राधानगरी आणि सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवले आहे.


25 हून अधिक वन कर्मचारी तैनात : 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय वनाधिकारी वन्यजीव कार्यालयाकडून अभयारण्य परिसरात वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच स्थानिक वन समिती ही परिसरात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून असणार आहे. वन्य कायद्याचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अभयारण्य परिसरात बंद काळात पर्यटकांनी येऊ नये, असं आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) श्रीकांत पवार यांनी केलं आहे. राज्यात अस्तित्वात असलेले वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कायद्यान्वये वन्यजीवांना इजा पोहोचवल्यास कायदेशीर शिक्षा तसेच दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी अशी कृत्य टाळावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

वासोटा किल्ल्यावरदेखील बंदी : अनेकांना पर्यटनाला जायला आवडतं. साताऱ्यातील वासोटा किल्ला (Vasota Fort ) हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या वासोटा किल्ल्याची दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी असते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात. नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होऊ नये म्हणून बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे (Vijay Bathe) यांनी तीन दिवस पर्यककांना वासोटा किल्ल्यावर बंदी घातली आहे.

हेही वाचा :

  1. ख्रिसमस, नववर्ष स्वागताला कोकण आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
  2. साताऱ्यातील 'या' किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी; महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांची गर्दी
  3. 'या' मेकअप टिप्सच्या मदतीने तुमचे नवीन वर्ष बनवा खूप खास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.