ETV Bharat / state

Navratrotsav 2021: पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकून अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता

author img

By

Published : Oct 3, 2021, 10:13 AM IST

Kolhapur
Kolhapur

येत्या 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेदरम्यान पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकण्यात आली. काल सकाळी 10 वाजता स्वच्छतेची सुरुवात झाली. दरम्यान, यंदा नवरात्रीत मंदिर भक्तांसाठी दर्शन घेण्यासाठी खुलं होणार आहे.

कोल्हापूर : येत्या 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. काल (2 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजल्यापासून मंदिरातील स्वच्छतेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे स्वच्छतेदरम्यान अंबाबाई मूर्तीला कोणत्याही पद्धतीची इजा पोहचू नये, यासाठी वर्षानुवर्षे सुरू असलेली पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकून ठेवण्यात आली होती.

अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त एक आठवडा आधीपासूनच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारीची सुरुवात होते. काल (शनिवारी) सकाळी 10 वाजल्यापासून अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

स्वच्छतेवेळी उत्सव मूर्ती असते दर्शनासाठी

दरवर्षी गाभाऱ्याची स्वच्छता असते तेंव्हा एक दिवस पूर्ण अंबाबाई मंदिर बंद ठेवण्यात येते. अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरात येत असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरातीलच सरस्वती देवीच्या मंदिरामध्ये अंबाबाईची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येते.

कोल्हापूर अंबाबाई मंदिर
कोल्हापूर अंबाबाई मंदिर

म्हणून झाकतात येरले पद्धतीने मूर्ती

अंबाबाईच्या मंदिरातील गाभाऱ्याची दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या अगोदर स्वच्छता केली जाते. स्वच्छतेदरम्यान अंबाबाईच्या मूर्तीला इजा पोहचू नये यासाठी पारंपरिक येरले पद्धतीने अंबाबाईच्या मूर्तीला सुरक्षित झाकून ठेवले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता असते तेंव्हा अशाच येरले पद्धतीने मूर्ती झाकून ठेवली जाते. दिवसभर गाभाऱ्यातील संपूर्ण स्वच्छता करण्यात येते.

यंदा मंदिर दर्शनासाठी खुलणार

कोरोनामुळे मंदिरं अध्याप बंदच आहेत. पण घटस्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून राज्यातील सर्वच मंदिर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक सूचना भाविकांना काटेकोरपणे पाळाव्या लागतील. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

मदिरात साडी, ओटी, प्रसादाला बंदी

कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करत सर्व भक्तांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. पूर्व दरवाज्यातून भक्तांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जाणार आहे. त्यानंतर देवीचे दर्शन झाल्यानंतर भाविकांना दक्षिण दरवाजातून बाहेर पाठवले जाणार आहे. अंबाबाई मंदिरात ओटी, प्रसाद आणि देवीला साडी आणि त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरुवातीला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवले जाणार आहे. या दरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी भक्तांसाठी सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो लागा तयारीला, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; सर्वत्र स्वच्छतेची लगबग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.