ETV Bharat / state

Bachchu Kadu On Ajit Pawar : खातेवाटपचा निर्णय राष्ट्रवादीच्या बाजूने - बच्चू कडू

author img

By

Published : Jul 15, 2023, 7:32 PM IST

अजित पवार गटाच्या युतीतील प्रवेशावर नाराज असलेले शिंदे गटाचे आमदार आता खातेवाटपावरून नाराज झाले आहेत. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले की, अजित पवारांकडे अर्थखाते दिले असले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

Bachchu Kadu On Ajit Pawar
Bachchu Kadu On Ajit Pawar

आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : महायुतीमध्ये अजित पवार सोबत आल्याने नाराज झालेले शिंदे गटाचे आमदार खाते वाटपानंतर देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे. खाते वाटपामध्ये राष्ट्रवादीला झुकते माप दिले आहे. अर्थ खाते जरी अजित पवारांकडे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे, असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेत नाराजीचे सूर : राज्यात भाजप शिंदे सरकारला एक वर्ष झाले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी अनेक आमदार देव पाण्यात ठेवून बसले होते. तर काही आमदारांनी आपण मंत्री होणार म्हणून नवीन कपडे देखील तयार करून घेतले होते. मात्र, राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर भाजप, शिवसेनेसोबत अजित पवारांचा गटही एकत्र आला. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या अनेक आमदारांना धक्का बसला. गेले वर्षभर मंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे दणका बसला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना सोडावी लागली त्याच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने शिवसेनेत आता नाराजीचे सूर उमटत आहेत.

अजित पवारांकडे अर्थ खाते : अजित पवारांसह त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसेनेचे आमदार नाराज झाले आहेत. तर काही आमदारांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. एक आठवडा झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना खातेवाटप झाले नव्हते. त्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते. अजित पवार यांना अर्थ खाते हवे असल्याने ते अडून बसले होते. तर दुसरीकडे अजित पवारांना अर्थ खाते देऊ नये यासाठी शिंदे गटाचे आमदार आग्रही होते. त्यानंतर अखेर दिल्लीत अजित पवारांना अर्थखाते देण्याचा निर्णय झाला. यासोबतच सहकार, कृषी यासारखी महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप : यामुळे खाते वाटपावरून देखील शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. खाते वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले असल्याचे दिसून येते असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच मागचा काळ पाहिला तर अजित पवारांना अर्थ खाते देण्यास आमचा सर्वांचाच विरोध होता. मात्र, आता अर्थ खाते जरी अजित पवारांकडे असले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार आहेत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

18 तारखेला निर्णय जाहीर करणार : एकनाथ शिंदे मागे जे झाले ते आता होऊ देणार नाहीत. या मंत्रिमंडळात मी मंत्रीपद मागत होतो. मात्र, मला मंत्रालय मिळाले यामुळे मी नाराज नाही. उलट दिव्यांग बांधवांसाठी कोणताही निधी मी कमी पडू देणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ. येत्या 17 तारखेला माझी मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. यानंतर 18 तारखेला मी माझा निर्णय जाहीर करणार, असे अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. यामुळे 18 तारखेला बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहणो औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde : 'फडणवीस राजकारणातील निष्कलंक माणूस; सकाळचा नऊचा भोंगा बंद करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.